दसऱ्याचा सण. उत्सवाचा सण. आजच्या या सुवर्ण दिनी शमी आणि आपटा या दोन्हींना फार महत्त्वाचे स्थान आहे. सोन्याचे प्रतीक असणारी आपट्याची पाने, शमीच्या झाडाची पूजा याशिवाय विजया दशमी तथा दसरा साजरा होऊच शकत नाही.
या दिवशी शमी आणि आपट्याच्या पानांना खास महत्व असते. या पानांचा मूळ गुणधर्म काय? आणि त्या पानांचे आयुर्वेदिक गुण कोणते हे पाहूया….
शमी
एकवीस पत्रींमध्ये समावेश असणारी शमी गणपती, हरितालिका वगैरेच्या पूजांमध्ये वापरली जातेच, पण शमीचे झाड औषधीसुद्धा असते. शमीचे झाड मध्यम आकाराचे, छोटी छोटी पाने असणारे आणि काटेरी असते. याची पाने वर्षभर हिरवीगार असतात.
हाती घेतलेल्या कामात यश मिळावे यासाठी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. काही प्रदेशात दिवाळीच्या दिवशी रात्रभर शमीची पाने भिजवून ठेवलेल्या पाण्याने स्नान करण्याचाही प्रघात दिसतो. आयुर्वेदात शमीच्या झाडाचे गुणधर्म याप्रमाणे सांगितलेले आहेत.
चव नसणे, मूळव्याध, जंत या पचनसंस्थेशी संबंधित विकारांवर शमी उपयोगी असते. तसेच ती रक्तशुद्धिकर असल्याने त्वचाविकारांवर उपयोगी पडते. शमीची पाने भिजत घातलेल्या पाण्याने स्नान करण्यामागे त्वचारोगांचा प्रतिबंध, त्वचारोगांवर उपचार हा हेतू असतो. शमी कफदोषशामक असल्याने खोकला, दमा या त्रासांवरही उपयुक्त असते.
आपटा.
याला संस्कृतमध्ये अश्मंतक असे म्हणतात. समोरच्याबद्दल आपल्या हृदयातला आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी दसऱ्याला खरे तर सोने वाटण्याची आपली परंपरा; पण खरे सोने देणे अवघड असल्याने त्याऐवजी आपट्याच्या झाडाचे हृदयाकृती पान देण्याची रूढी पडली असावी.
वनस्पतींची मुख्यत्वे साल, काही प्रमाणात पाने व फुले औषधात वापरली जातात. तोंड आल्यास सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्यास बरे वाटते. आपटा मूतखडा विरघळवून किंवा बारीक करून शरीराबाहेर निघून जाण्यास मदत करतो, मूतखडा वारंवार होण्याची प्रवृत्ती समूळ नष्ट करतो; तर कांचनार मुख्यत्वे रसधातूची शुद्धी करतो, रसग्रंथींमधील दोष दूर करून सूज उतरवण्यासाठी सहायक असतो. सुवर्ण भस्म करण्यापूर्वी सुवर्णाची शुद्धी करण्यासाठी कांचनाराच्या सालीचा काढा वापरला जातो.
🍃आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार
आनंदाच्या क्षणी करा तुम्ही शुभेच्छांचा स्विकार !
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा !