हेरले / प्रतिनिधी
सुधारीत पशुधनाबरोबरच दूध उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक शेतक-यांना गोकुळ दूध संघ सर्वोतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. असे मत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळचे) संचालक अजित नरके यांनी व्यक्त केले. ते म्हैस दूधवाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमातंर्गत कुंभोज येथे आयोजीत गोठा भेट प्रसंगी बोलत होते. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यु.व्ही.मोगले, वैरण विकास अधिकारी भरत मोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुंभोज येथील दूध उत्पादक शेतकरी सुनिल भोकरे यांचा जातीवंत मुऱ्हा म्हैशींचा गोठा व कुंतिनाथ चौगले यांचा जर्शी (एच.एफ), गीर, साहिवाल, खिलारी (साधी) व कपीला आदी गाईंच्या मुक्त गोठ्यांना पन्हाळा तालुक्यातील सुमारे शंभर दूध उत्पादक शेतकरी सभासदांना घेवून भेट दिली. यावेळी त्यांना प्रगतशील पशुधन शेतकरी सुनील भोकरे व कुंतीनाथ चौगले यांनी जातीवंत जनावरांचे व्यवस्थापन, संगोपन, ओला, वाळलेल्या चाऱ्याची लागवड, उपलब्धता, सायलेज, मुक्त गोठा पशुखाद्य, मिनर्लस आदी बाबींवर उपस्थित महिला व पुरुष दूध उत्पादक शेतकऱ्यांना सविस्तर माहिती सांगितली. तसेच संवाद- प्रतिसंवाद पार पडला.
याप्रसंगी डॉ. दळवी, डॉ.बारवे, संकलन अधिकारी आनंद चौगुले, धनंजय यादव, संजय पाटील, संग्राम गायकवाड, एलआरपी सौ. नम्रता पोवार, अमोल पोवार यांच्यासह पन्हाळा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
पुलाची शिरोली, कुंभोज येथील भोकरे यांच्या गोठ्यातील जातीवंत जनावरांची संगोपनाबाबत माहिती घेताना गोकुळचे संचालक अजित नरके. प्रसंगी डॉ. यु.व्ही. मोगले, डॉ. दळवी आदी.