दि. ११ मार्च रोजी जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चात शाळा बंद ठेवून शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार.
कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार १००% अनुदान दिले जात नाही. तसेच घोषित शाळा पात्र असूनसुध्दा त्यांना अनुदान दिले जात नाही व दि. ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नेमलेल्या काही सेवकांना अजुनही जुनी पेन्शन योजना दिली जात नाही म्हणून कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आयोजित केलेल्या शुकवार दि. ११ मार्च, २०२२ रोजीच्या आक्रोश मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार असल्याचा निर्णय आज मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन, येथील कार्यालयात झालेल्या सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभाध्यक्ष एस.डी.लाड होते.
प्रचलित नियमानुसार राज्यातील कायम विनाअनुदान शाळांना १००% अनुदान मिळालेच पाहिजे. तसेच घोषित पण अद्यापि, अनुदान न मिळालेल्या शाळांना अनुदान मिळावे यासाठी आजपर्यंत विविध प्रकारची आंदोलने करून शासनाकडे सातत्याने मागणी केली. परंतु अजुनही या शाळांना शासन पुरेपूर न्याय देत नाही. या शाळांचा प्रश्न कायमपणे शासनाने सोडवावा ही मागणी घेवून कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. सदरचा आक्रोश मोर्चास दुपारी १२.०० वाजता दसरा चौकातून सुरुवात होवून बिंदू चौक, शिवाजी पुतळा, माळकर तिकटी मार्गे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जाईल. विभागीय उपसंचालकांना निवदेन दिले जाईल. दि. ११ मार्च रोजीचे शालेय शैक्षणिक कामकाज रविवार दि. १३मार्च रोजी शाळा सुरु ठेवून भरून काढले जाईल.
या सभेस मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मिलिंद पांगिरेकर, बी. जी. बोराडे, इरफान अन्सारी, खंडेराव जगदाळे, डी. पी.कदम, सुदेश जाधव, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, राजाराम बरगे, आर. डी. पाटील, प्रा.सी. एम. गायकवाड, अरूण मुजुमदार, संतोष आयरे, गजानन काटकर, कैलास सुतार, अशोक पाटील, शिवाजी यल्लाप्पा कोरवी आदी प्रमुख मान्यवरांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.