Wednesday, 23 March 2022

mh9 NEWS

पर्यावरण संवर्धन काळाची गरज - डॉ.अजितकुमार पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी 

अवनीने सुजनतेला प्रथम जन्म दिला मनुष्यरूपात ! परमेश्वराला वाटलं की या वसुंधरेला फुलवणारं चैतन्य इथे उमलावे, देवांचे व दैत्यांचे समान अंकुर रुजून, एका नंदनवनाची निर्मिती व्हावी, ज्याने या सागरांबरेला औदार्य शिकवावे, या क्षमेला, प्रेम, दया, शांती या जीवनमूल्यांचे बाळकडू पाजावे. पृथ्वीवर नंदनवन निर्माण करावे, हिरव्यागार मखमली सदाहरित वनांचा प्रसार सर्वत्र व्हावा आणि यासाठीच तर मनुष्याने जन्म घेतला आहे.
कावळा करतो कावकाव म्हणतो; माणसा झाडे लाव, एक तरी झाड लाव, असे म्हणतच आपण मोठे झालो या बालगीतातील बोध मात्र तेथेच विसरून गेलो. पर्यावरण हा शब्द आपणासाठी नवीन नाही, अगदी साध्या शब्दांत पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाची गोळाबेरीज, पर्यावरणाचा समतोल टिकविण्याचे काम निसर्ग करतो. जेव्हा निसर्गाच्या कार्यात माणसाचा नको तेवढा हस्तक्षेप वाढतो. म्हणजे हवा, पाणी, जमिनीचा नको तेवढा व नको तसा वापर होऊ लागतो तेव्हा पर्यावरणाचा समतोल बिघडतो. मानवाचे स्वास्थ्य हे पर्यावरणाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते पर्यावरणाचे स्वास्थ्य बिघडले की आपले स्वास्थ्य बिघडते. आपल्या स्वास्थ्याची पर्यायाने पर्यावरणाची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी नाही का ? पूर्वादीकालापासून संतांनी स्वतःच्या साहित्यातून व वर्तनातून हा आपल्या पर्यावरणाचा समतोल तर सांभाळला आहेच व मार्गदर्शनही केले आहे.
"वृक्षवाली आम्हां सोयरे वनचरे ।
पक्षी ही सुस्वरे आळविती ॥
तेणे सुखे रूचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत असे ॥ म्हणणाऱ्या तुकोबांनी वृक्ष-वेलींना आपले सगे-सोयरे संबोधले आहे. पण झाडे आपल्याला आरोग्यदायी जीवन देतात कारण 'काळी माती हिरवी सोने' प्राणवायूचे हे कारखाने आपण काटकसर करून सोने विकत घेऊ, प्रतिष्ठा वाढेल सर्व काही मिळेल केव्हा ? "शिर सलामत तो पगडी पचास' आपण आरोग्याची मूर्ती असू तेव्हा त्या सोन्याचे तेज वाढले ना
आज धूर ओकणारी वाहने व त्यातील कार्बन त्याबरोबर इतरही अपायकारक घटकद्रव्ये ही आरोग्याला मारक ठरत आहेत. श्वसनांच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. शहराच्या दगदगीच्या जीवनात शांती मिळते कुठे माणूस ती शोधायला निसर्गरम्य परिसराकडे वळतो. पण अशी वृंदावने, बागा आहेत तरी किती ? यांचे प्रमाण इतके कमी का ? याचा थोडा जरी विचार माणसाने केला तर आढळून येते की शहरवासीयांनी टुमदार इमारती, मोठमोठे कारखाने, बांधकामे यांकरिता वृक्षांचा नाश केला वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके झाले, रखरख वाढली, पाऊस अनियमित झाला व पर्यायाने पर्यावरणाचा निसर्गाचा समतोल बिघडला स्वच्छ हवेऐवजी प्रदूषित हवा. याशिवाय पर्याय राहिला नाही. याची जाण आता होऊ लागली आहे. ही एक रोगराई विरुद्धची लढाई आहे. धुरीकरणामुळे सातत्याने छळणारा खोकला हा आपण मित्र बनू न देता वेळीच वृक्ष तोड रोखली पाहिजे. आत्तापर्यंत झालेल्या गोष्टीबद्दल चिंता करीत बसण्यापेक्षा नव्याने वृक्ष लागवड करणे यातच शहाणपणा आहे. वेळीच जागा होणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे असा हा एककलमी कार्यक्रम अमलात आणणे गरजेचे आहे.
'दुर राहे पाषाणात तया चारा कोण देतो' म्हणणाऱ्या संत सेना महाराजांनी आपणाला प्रश्न केला आहे की जर खडकाखाली राहणाऱ्या बेडकाला आपण चारा देत नाही तर आपल्याला त्याला नष्ट करण्याचा अधिकार काय ? पर्यावरण दूषित करणारे कृमी, कीटक खाऊन बेडूक पर्यावरणाला मदत करतो तो मानवाचा मित्र ठरतो. 
वृक्षतोड झाल्याने प्राणीजीवनदिवाळीत होऊन त्यांना निवाऱ्याची उणीव भासते व काहीवेळेस त्यांचा शिरकाव शहरांमध्ये झाल्यास त्यासारखे भयास्पद ते काय? पाणी, हवा, प्राणी, वृक्ष या सर्वाचा हितकारी संगम म्हणजेच पर्यावरणाचा समतोल वृक्ष मानवाचा खरा मित्र आहे तो त्याला लागवड करून सांभाळ करणाऱ्याला आणि त्याचे तोडून तुकडे करणाऱ्यालाही आपली थंड सावली, शुद्ध हवा, फळे, फुले देतो तो कुणाबरोबरही दुजाभाव करीत नाही. ऊन, वारा, पाऊस, धूळ, कार्बनडायऑक्साईड सर्व काही सहन करून मानवाला पर्यावरणाच्या समतोलाचा व समतेचा संदेश देणाऱ्या वृक्षाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जो खांडावया घावो घाली की लावणी जयाने केली दोघा एकचि साऊली । वृक्ष हे जैसा वृक्षाकडून ॥ हा संदेश जरी आपण घेतला तरी दैनंदिन जीवनातले आपले प्रश्नही सुटतील यात शंका नाही. आपण स्वतःहून वृक्षलागवड करत नसू तर शासनाकडून किंवा सामुदायिकरीत्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचे संगोपन तरी आपण नक्कीच करू शकतो. वृक्षांचा गैरवापर केल्यास प्रदूषणासारख्या महाभयंकर संकटास तोड देण्याची वेळ आपल्यावर येईल, हे आपण जाणून आहोतच.
वृक्ष म्हणजे पृथ्वीने आशीर्वादासाठी उचललेले हात आहेत. ते आशीर्वाद नसतील तर मानवजीवन टिकणार नाही बालपणीच्या पाळण्यासाठी मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्याला सोबत करतात. या भूतलावर आधी वनस्पती व नंतर प्राणिसृष्टी जन्माला आली आहे, वनस्पती नष्ट झाल्या तर त्या मागोमाग मानवी जीवनही नष्ट होईल. शहरांतील सिमेंट-कॉक्रीटच्या उंच जंगलापेक्षा आपणांस जीवन ताळ्यावर आणण्यासाठी उंच उंच वृक्षराजींच्या वेसणीची गरज आहे मानवाला आज तनशांतीपेक्षा मनःशांतीसाठी जास्त भटकावे लागत आहे. बाजारात टाकला की खाण्यापिण्यातून, हिरव्याफिरण्यातून मनःशांती प्राप्त होत आहे. पण मनाच्या शांतीचा लळा बाजारात पुरविला जाऊ शकत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेले मन बगीचा, उद्यान, अभयारण्य, वन, समुद्र, नदीकाठ, सरोवराच्या शोधात बाहेर पडते. निसर्गरम्य वातावरणासाठी खरी गरज आहे-वृक्षांची यासाठी का होईना आपण सामाजिक वनीकरण इ. माध्यमांतून केलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपल्या स्वार्थी व नियोजनशून्य वृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. आजपर्यंत असे केले असले तरी आज सर्वांना अशी शपथ घेण्याची गरज आहे. 'झाडे लावू आणि झाडे जगवू.' या क्षेत्रात घोषणांना महत्त्व नही प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे. "झाडांविन जीवन म्हणजे जीव नअसणे होय " आपल्याकडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काही केले जात नसेल ते
किमान पर्यावरणाचा असमतोल होईल असे आपणाकडून काही होऊ नये याची तरी दक्षता आपण घ्यायलाच हवी.
आज एकविसाव्या शतकात वावरत असताना आपण सर्वांनी निसर्गाच्या बद्दल जागरूकता राखणे काळाची गरज आहे नाहीतर एक दिवस असा उजाडेल की माणूसच स्वतःला विसरून जाईल की आपण कोण आहे,व सैरभैर पळत सुटेल....

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :