हेरले / प्रतिनिधी
शालेय जीवन हे आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आव्हानात्मक कालखंड असतो. त्याचा योग्य वापर झाल्यास स्वत:चे व देशाचे भवितव्य बनण्यास मदत होते. हा काळ पुन्हा मिळत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील वेळेचा सदुपयोग केला पाहिजे असे मत कोल्हापूरच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केले. डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास श्री. सुशांत फडणीस , श्री.प्रवीण थोरात हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात ऑनलाईन वर्ग असताना देखील पुनावाला स्कुलने विद्यार्थ्यांमधील विविध कलागुण, क्रीडा नैपुण्य जपण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेते, गुणवंत विद्यार्थी, टॅलेंट हंटचे विजेते, आदर्श पालक, आदर्श विद्यार्थी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागातील विजेत्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले .
यावर्षी पूर्व प्राथमिक विभागात कु. मैथिली पटेल तर, प्राथमिक विभागात गार्गी कोळेकर हे आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले. माध्यमिक विभागात आयुष देवस्थळीने हा पुरस्कार पटकावला. साहिल साठे हा निवासी शाळा विभागातील आदर्श विद्यार्थी ठरला.
शाळेच्या मैदानात झालेल्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. यावेळी पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांचा फॅशन शो विशेष लक्षवेधी ठरला.
बक्षीस वितरण सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, सचिवा सौ. विद्या पोळ, प्राचार्य डॉ. सरदार जाधव, समुपदेशिका डॉ. माधवी सावंत, सागर फरांदे, मीनल पाटील, आश्लेषा पाटील, शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते . आभार प्रदर्शन भैरवी भोसले यांनी मानले.
*पालकांनाही पुरस्कार*
शाळेच्या वतीने पालकांना देखील आदर्श पालक पुरस्काराने गौरवण्यात आले. पुर्व प्राथमिक विभागात प्रभूंश पृथ्वीराजसिंग भोसलेचे पालक श्री व सौ. पृथ्वीराजसिंग भोसले, प्राथमिक विभागात सान्वी चौगुलेचे पालक श्री व सौ सीमा शांतीनाथ चौगुले, माध्यमिक विभागात मोहम्मद मोमीन यांचे पालक श्री व सौ. सफीना मोमीन हे आदर्श पालक ठरले. तर निवासी शाळा विभागात निलांकर भट्टाचार्यचे पालक श्री व सौ. दिपांकर भट्टाचार्य, तनिष्का कलंत्रेचे पालक श्री व सौ भारतेश कलंत्रे यांना आदर्श पालकाचा पुरस्कार पटकावला.