हेरले/प्रतिनिधी.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी 18 तारखेला पनवेल जिल्हा रायगड येथे होणार्या शिक्षण परिषद व त्रैवार्षिक अधिवेशनाला शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
पत्रकार परिषदेत पाटील पुढे म्हणाले प्राथमिक शिक्षकांची जुनी पेंन्शन योजना, पदनिश्चिती (संच मान्यता), एम एस सी आय टी मुदतवाढ आंतरजिल्हा बदली असे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आणि गुणवत्तापुर्ण प्राथमिक शिक्षण देण्यासाठी कटिबध्द असणाऱ्या शिक्षकांनी मोट बांधून शिक्षणाच्या खाजगीकरणाचा बाजार उधळून लावण्यासाठी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करायचा आहे.
शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार करुन गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी विविध भौतिक सुविधांची संपन्नता आपल्या शाळांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नपुर्वक कार्य करुन आपले क्षेत्र आबाधित ठेवण्यासाठी आपण नवी चळवळ उभारली पाहिजे त्यादृष्टीने या ऐतिहासिक अधिवेशनास जिल्ह्यातून हजारो शिक्षक उपस्थित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील म्हणाले राज्यातील नोव्हेंबर 2005 नंतर शिक्षक म्हणून रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना 10,20 व 39 वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी.केंद्रप्रमुख पदे 50 टक्के पदोन्नतीने व 50 टक्के शिक्षकातून सरळसेवा परीक्षा घेऊन भरण्यात यावी. विस्थापित व संवर्ग-4 साठी विशेष संवर्ग तयार करावा,शिक्षकांना निवडणूक विभागासह आदी अशैक्षणिक कामातून वगळण्याच्या मागणीचा अधिवेशनात रेटा असणार आहे.यामागण्या मान्य होतील असे सांगितले.
यावेळी संघाचे एन वाय पाटील, मोहन भोसले, एस.व्ही पाटील, सुनील पाटील, लक्ष्मी पाटील, रघुआप्पा खोत, बाळकृष्ण हळदकर, दुंडेश खामकर, अरुण चाळके, किरण शिंदे आदी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.