पन्हाळा : पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा यांच्या वतीने ऐतिहासिक पन्हाळा - गजापूर - विशाळगड परिसराचा अभ्यास करण्यासाठी दि . 28 व 29 रोजी शोध मोहिमेचे आयोजन केले आहे .
जुलै महिन्यात हजारो शिवप्रेमी पन्हाळा ते पावनखिंडीपर्यंत चालत जातात . कासारी नदीचे उगमस्थान पावनखिंड मानली जाते .प्रस्थापित पावनखिंडीबाबत अभ्यासकांच्या मध्ये मत - मतांतर आहेत . अशा प्रकारच्या पाच - सहा खिंडी गजापूर परिसरात आहेत . असे मत पन्हाळ्याचे इतिहास अभ्यासक मु.गो.गुळवणी यांनी मांडले होते .ऐतिहासिक साधनातून गजापूरच्या घाटी मध्ये युद्ध झाले असे दिसून येते .प्राथमिक साधनांच्या आधारे या संपूर्ण परिसराचा अभ्यास करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले असल्याचे पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष व शोधमोहिमेचे समन्वयक शिवप्रसाद शेवाळे यांनी पत्रकाद्वारे सांगितले .
या मोहिमेमध्ये पहिल्या दिवशी पन्हाळा येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मा.असिफ मोकाशी (माजी नगराध्यक्ष)यांच्या हस्ते पुष्पहार घालून मोहिमेची सुरुवात होईल.शाहीर प्रा. भिकाजी लाड पोवाडा सादर करतील व एव्हरेस्टवीर अंकुश तेलंगे 'सह्याद्रीची भटकंती ' या विषयावर मार्गदर्शन करतील.
दुसऱ्या दिवशी या मोहिमेमध्ये गजापूर परिसरातील खिंडीचा अभ्यास भौगोलिक व ऐतिहासिक साधनांच्या आधारे केला जाईल. यावेळी श्री. विनय चोपदार (इतिहास अभ्यासक ,कोल्हापूर)हे मार्गदर्शन करतील.या शोधमोहिमेची सांगता किल्ले विशाळगडावर होईल.
ही शोधमोहिम शिवप्रसाद शेवाळे ,सुदर्शन पांढरे यांच्या नेतृत्वाखाली होत असून धीरज कठारे , स्वप्नील पाटील, मृणाल शेटे , रणजित शिंदे , दक्षता तेलंगे , संदीप मोरे आदी पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ,पन्हाळा , वुई केअर सोशल फौंडेशन ,कोल्हापूर , ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन , कोल्हापूर चे अभ्यासक , विद्यार्थी , इतिहासप्रेमी सहभागी होणार आहेत .