हेरले / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील हेरवाड व हातकणंगले तालुक्यातील माणगाव कोरोची गावाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत माले ग्रामपंचायतीने आपल्या गावातही विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरातून पुन्हा एका परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. प्रथम कोल्हापूरमधील हेरवाड गावाने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त हा ऐतिहासिक निर्णय घेतला.
हेरवाड माणगाव व कोरोची पाठोपाठ आता कोल्हापुरातील माले( ता. हातकणंगले) या गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मंगळवारी ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला.तसेच त्यांच्या वयाचा विचार करून पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सध्या परिसरात या गावाचे कौतुक केले जात आहे.
या गावात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ग्रामपंचायत सरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील, उपसरपंच अनिता सकटे तसेच इतर सदस्य नेहमीच निर्णयांना पाठिंबा देताना पाहायला मिळाले आहेत.पतीच्या निधनानंतर समाजामध्ये विधवा महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसणे, पायातील जोडव्या काढणे, हातातील बांगड्या फोडणे, गळयातील मंगळसूञ काढले जाते. शिवाय विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले जात नाही. यामुळे गावासह देशात विधवा महिलेना सन्मानाने जगता यावे याकरिता ही प्रथा बंद करणेचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या गावाने जिल्ह्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.यावेळी ग्रामसेवक सुनील खांडेकर व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
माले : येथे ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदचा निर्णय घेतला या प्रसंगी सरपंच बंटी पाटीलसह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ