कोल्हापूर / प्रतिनिधी
सुळकुड (ता. कागल) येथील प्रगतशील शेतकरी मलगोंडा सातगोंडा टेळे यांनी
कृषी विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या भात पीक स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेत आपले सातत्य कायम ठेवून भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे.
सुधारित संकरित वाणांचा वापर, सुयोग्य व्यवस्थापन यामधून सुळकुड येथील प्रगतशील शेतकरी मलगोंडा सातगोंडा टेळे यांनी दहा गुंठ्यांमध्ये ११५० किलो इतके प्रचंड उत्पादन घेऊन २०२० चा भात पीक स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या अगोदर २०१५ मध्ये राज्यस्तरीय दुसरा २०१८ मध्ये राज्यस्तरीय तृतीय २०१९ मध्ये राज्यस्तरीय तृतीय क्रमांक ही मिळवलेला आहे.
२०२० चे कृषी विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा नाशिक येथे नुकताच पार पडला. भात पीक स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद राज्याचे राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारीजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांच्या हस्ते मलगोंडा सातगोंडा टेळे यांना प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याच्या प्रसंगी राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार, विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ , मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यांचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले , मंत्री छगन भुजबळ यांच्यसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.