शिरोली / प्रतिनिधी दि. १६/५/१८
अवधूत मुसळे
समाजातील सर्व घटकांनी भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी भ्रष्टाचार विरोधी कारवाई करण्यासाठी निर्भय व सज्ञान बनले पाहिजे. भ्रष्टाचारी वृत्तीस धडा शिकविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून लोकसेवकांची तक्रार देऊन भ्रष्टाचार संपविण्यासाठी व भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी साध द्या असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक गिरीश गोडे यांनी केले. ते मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने भ्रष्टाचारावर मात करण्याच्या प्रबोधन शिबीरा प्रसंगी बोलत होते.
उप अधिक्षक गोडे पुढे म्हणाले की, कोणताही लोकसेवक आपणांकडे शासकिय कामासाठी पैसे मागत असेल तर त्याच्या विरूद्ध कारवाई करता येते. त्यासाठी स्वतः निर्भय बनून गोपनियता बाळगावी. प्रथमतः लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून स्वतः हस्तक्षरात तक्रार अर्ज त्या लोकसेवकाच्या विरोधात दयावा लागतो. तदनंतर विभागाकडून पंच समवेत त्या लोकसेवकाची भेट घेऊन त्याने पैशाची मागणी केली आहे ही सत्यता पंचच्या साक्षीवरून तसेच त्यांच्या कडील व्हाईस रेकॉर्ड वरून आवाज ऐकून आदी बाबी पडताळून पुढील कारवाईचा सापळा रचला जातो. त्याआगोदर तक्रारदाराकडे मागितलेली रक्कम विभागाकडे पावडर लावणे व त्या नोटांचा नंबर नोंद करण्यासाठी दयावी लागते.
त्या लोकसेवकाला लाचेची रक्कम स्विकारतांना पकडणेसाठी दिवस व वेळ ठरली जाते. त्यांच्या सोबत पंच ही पाठविले जातात. त्यावेळी आजूबाजूला लाचलुचपत विभागाचे अधिकारी दबा धरून असतात. ज्यावेळी तक्रारदार लोकसेवकास रक्कम देतो. त्यानंतर तात्काळ बाहेर येऊन तो अधिकाऱ्यांना इशारा करताच त्या लोकसेवकास पकडले जाते. सर्व घटनेचा घटनास्थळी शासकिय नोकर पंचाच्या समोर पंचनामा करून त्याच्यावर गुन्हा नोंद करून न्यायालयात हजर करतात. न्यायालयातून त्यांस जामिन मिळून त्याची अटकेतून सुटका होते. मात्र त्याच्या विभागास लाचलूचपत विभागाचे कारवाईचे पत्र गेल्यानंतर त्या विभागाकडून तात्काळ त्या लोकसेवकाचे तीन ते सहा महिन्यासाठी निलंबन होते.
तक्रारदाराची ती रक्कम न्यायालयात हजर करावी लागत असल्याने शासनाकडून त्या रक्कमेचा चेक मिळतो. दोषारोप न्यायालयात पंचनामा करून दाखल केले जाते.तक्रारदाराने आपला जबाब नोंदवितांना विवेक बुद्धीने नोंदवावा तोच न्यायालयात निर्भयतेने मांडावा त्यामुळे त्या लाची लोकसेवकास १० वर्षापर्यंत तुरूंगवास होऊ शकतो.पुढील कार्यवाहीसाठी तक्रारदार निर्भय बनने महत्त्वाचे असते. आजपर्यंतच्या कारवाईमध्ये पंचवीस टक्के शिक्षा झाल्या आहेत. जे निर्दोष सुटले आहेत त्यामध्ये तक्रारदारांच्या जबाब बदल व न्यायालयातील बोलण्यामध्ये विसंगती म्हणून तक्रारदार निर्भय होणे महत्त्वाचे असते.
खाजगी व्यक्ति काम करतो म्हणून पैसे मागून फसवणूक करीत असेल तर त्याच्यावरही कार्यवाही करता येते. आपली आर्थिक फसवणूक व लुबाडणूक होऊ नये म्हणून सतर्क राहून लाचलुचपत विभागाशी संपर्क साधा असे आवाहन केले.
या प्रसंगी सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच किरण चौगुले, पोलीस पाटील अमीर हजारी, तंटामुक्ती अध्यक्ष राजू थोरवत, प्रताप रजपूत, अवधूत मुसळे, माजी उपसरपंच सुरेश कांबरे, प्रकाश कांबरे, महेश कांबरे, संदिप उलस्वार, पोलीस पाटील महादेव सुतार (टोप), धनंजय शिंदे ( भुये ) अंजली पाटील (हालोंडी) ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार अवधूत मुसळे यांनी मानले.
फोटो कॅप्शन
मौजे वडगांव ग्रामपंचायतीमध्ये लाचलुचपत कारवाई संदर्भात मार्गदर्शन करतांना पोलीस उप अधिक्षक गिरीश गोडे व इतर मान्यवर