शिरोली/ प्रतिनिधी दि. १३/४/१८
अवधूत मुसळे
हेरले परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची गेली सात वर्षापासून अक्षरक्ष: चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी स्थिती झाली असून शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या गांधारीच्या भूमिकेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. नागरिकांना या रस्त्यावरूनच सातत्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसल्याने शाररिक व्याधींसह वाहनांच्या मोडतोड मुळे आर्थिक बुर्दंडचा सामना करावा लागत आहे.
मौजे वडगांव ते हेरले दीड किमी अंतर आहे. हा रस्ता आठ वर्षापूर्वी पक्क्या स्वरूपाचा केला होता. काही महिन्यानंतर पावसाच्या माऱ्यामुळे व दोन्ही बाजूच्या शेतवडीतील रस्त्यावरून पाणी वाहत व साठून राहिल्याने रस्त्याची चाळण होऊन खडडेमय बनला. तदनंतर आठ वर्षापर्यंत अशा चाळण व खड्डेमय रस्त्यातून नागरिकांनी प्रवास केला. त्यापैकी मागील वर्षी पाऊण किमीचा रस्ता केला. तर उर्वरीत पाऊण किमी रस्त्यात खड्डे इतके आहेत, साधे चालताही येत नाही,प्रवास करतांना तर मोटरसायकल व वाहन चालकांना अक्षरक्ष: सर्कस करावी लागते. लोकांना या रस्त्यावरून सातत्याने प्रवास करावाच लागल्याने पाठीचे, मानेचे आजारास सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पाणी साठून राहिल्याने रात्रीच्या वेळी अनेक सायकल व दुचाकी स्वारांचे अपघात होऊन जखमी व जायबंद झालेले आहेत.
मौजे वडगांव ते नागांव हा डांबरी रस्ता सात वर्षापूर्वी केला होता. मात्र रस्त्याच्या खालचा भाग काळी मातीचा असल्याने पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे खचला गेला. रस्त्याचा मधला भाग तसाच राहून दोन्ही बाजू एक ते दीड फूटापर्यंत खचला गेला आहे. त्यामुळे याही रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले असून दुचाकी चारचाकी गाडी चालवताच येत नाही. हा रस्ता एमआयडीसी औदयोगिक वसाहतीस जोडला आहे. हेरलेसह परिसरातील रूकडी, चोकाक, अतिग्रे, माले, मुडशिंगी, मौजे वडगांव, नागांव, आदी गावातील लोक कारखान्यात कामास जात असल्याने दैनदिंन या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र रस्त्याची दुरावस्था झालेने प्रवास करणे कठीण बनले आहे. शाररिक तंदरुस्तीच्या समस्यासह वाहनाचीही मोडतोड होत आहे.
मौजे वडगांव ते तासगांव ,पेठवडगांव डांबरी रस्ता पाच ते सहा वर्षापूर्वी केला होता. मात्र या रस्त्यात पडलेल्या खडडयांचा ज्या त्या वेळी पॅच वर्क न केल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. हा मार्ग पेठवडगांवास जाण्याचा सोयीचा मार्ग आहे. शिरोली मार्गे या ठिकाणी जायचे झाल्यास दीडपट प्रवास करावा लागतो. म्हणून या रस्त्यावरून अनेकजण सातत्याने प्रवास करतात. मेडीकल कॉलेज, विविध ज्ञान विभागाच्या शाळा, महाविद्यालये, मोठी बाजारपेठ, जनावरांचा बाजार, न्यायालय, हॉटेल्स, दवाखाने, डी.एड, बीएड कॉलेज, आदीमध्ये नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांची, विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी यांची वर्दळ सातत्याने असते. मात्र रस्ताची चाळण झाल्याने प्रवास करणे महाकठीण बनले आहे. याही रस्त्यावर अनेक अपघात होऊन प्रवाश्यांना शाररिक व्याधींना सामोरे जावे लागले आहे.
हेरले परिसरातील रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जि.प. अध्यक्ष, आमदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य काही वेळेला कार्यक्रमानिमित्त या गावांना भेटी देतात. मात्र या रस्त्याची दुरावस्था पाहून या परिसरातील लोकांना प्रवास करतांना किती त्रास होत असतो. याची कल्पना येत नसेल का? हा संशोधनाचा मुद्दा ठरत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ रस्त्यास शासनाकडून निधी मंजूर होऊन रस्ता केला जावा अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.
फोटो - हेरले परिसरातील मौजे वडगाव ते हेरले , नागांव व पेठवडगांव रस्त्यांची दुरावस्था.