कोल्हापूर/ प्रतिनिधी दि. १७/४/१८
मिलींद बारवडे
सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग १, २ व ३ मधील शिक्षकांची बदली संदर्भातील माहिती भरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच संवर्ग ४ मधील शिक्षकांची माहिती भरण्याचे पोर्टल सुरू होणार आहे .परंतु विषय शिक्षकांना सदरची माहिती भरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याामुळे शिक्षकांच्यामधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे .
कारण महाराष्ट्रात अनेक जिल्हय़ात विशेषत: कोल्हापूर जिल्हयात इ. ६ ते ८ या वर्गांना शिकविणेकरिता विषयावर अशी विशेष शिक्षकांच्या कोणत्याही प्रकारे नेमणुका करण्यात आलेल्या नाहीत .किंबहुना आपली नेमणूक कोणत्या विषया करता आहे हे कोणत्याच शिक्षकाला माहिती नाही .अशा परिस्थितीत सध्या जास्तीत जास्त जुने पदवीधर शिक्षक इंग्रजी विषयाचे तर नवीन विषय शिक्षक हे इतर विषय शिकवताना दिसून येतात. बदली पोर्टलमध्ये माहिती भरताना आपण शिकवत असलेल्या विषयानुसार माहिती भरायची की ,आपल्या पदवीच्या विषयानुसार माहिती भरायची याबाबत शिक्षकांच्यामध्ये प्रचंड संभ्रमावस्था असून ठोस माहितीच्या अभावी त्यांना प्रचंड मनस्तापास सामोरे जावे लागत आहे .असे असूनही या संदर्भात तालुका व जिल्हास्तरावरील कोणतेही सक्षम अधिकारी याबाबत स्पष्ट माहिती देताना दिसून येत नाहीत .जर याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही तर शिक्षकांच्या हातून चुकीची माहिती भरली जाऊन चुकीच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पदवीधर विषय शिक्षकांच्यावर बदली प्रक्रियेमध्ये प्रचंड अन्याय होण्याची शक्यता आहे .
कारण अवघड क्षेत्रातील शिक्षक सर्वसाधारण क्षेत्रात येण्यास समन्वय समितीचा विरोध नसून विरोध हा खो-खो च्या खेळखंडोबाला आहे .कोल्हापूर जिल्ह्यात ३४ शिक्षकांनी दुर्गम भागातून सुगम भागात येण्यासाठी विनंती केली आहे .मात्र एकंदरीत ५ हजारांवर शिक्षकांच्या विनाकारण बदल्या होण्याची शक्यता आहे .३४ मधील ९० टक्के शिक्षकांची सेवा दुर्गममध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झालेली नाही .यापूर्वीही सदर शिक्षक सुगम मध्ये सोयीत कार्यरत होते .त्यातील बहुतांशी शिक्षक शाळेतील पटसंख्या न टिकवल्यामुळे अतिरिक्त म्हणून तिकडे गेले आहेत.उलटपक्षी सध्या बदली पात्र असलेले बहुतांशी शिक्षक यापूर्वी शेकडो किलोमीटर अनेक वर्षे सेवा त्या काळातील दुर्गम भागात केलेली आहे . म्हणून दुर्गम भागातील शिक्षकांना सोयीसाठी प्राधान्य देऊन समुपदेशाने जिल्हास्तरावर बदली धोरण राबवण्याची समन्वय समितीची मागणी होत आहे . जिल्हांतर्गत बदलीमध्ये खो-खो ची पद्धत रद्द करून कार्यरत शाळा व तालुक्याची ज्येष्ठता धरून प्रशासकीय बदल्या कराव्यात .नवीन शिक्षक भरती केल्यास समानीकरण करावे लागणार नाही. जिल्हांतर्गत बदल्या या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षेत ऑनलाईन ऐवजी समुपदेशन पद्धतीने केल्यास सर्वांचे समाधान होईल असे समन्वय समितीचे म्हणणे आहे .
असे न केल्यास शिक्षकांचे आंदोलन होऊन शैक्षणिक वातावरण ढवळून निघेल .त्याचबरोबर घटनेचे कलम २४३ चे अवमूल्यन व १२/९ च्या शुद्धी पत्रकावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग होईल. तसेच न्यायालयाचा अवमान केला आणि जी.आर .नुसार बदल्या केल्या नाहीत म्हणून अनियमिततेबद्दल असंख्य याचिका कोर्टामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता समन्वय समितीने व्यक्त केली आहे . यासंबंधीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे नेते मोहन भोसले , अध्यक्ष रविकुमार पाटील , मार्गदर्शक राजाराम वरुटे , प्रसाद पाटील, सरचिटणिस सुरेश कोळी आदींनी ग्रामविकासचे सचिव असिम गुप्ता यांना दिले आहे . अशी माहिती प्रसिध्दीस पत्रकाद्वारे रविकुमार पाटील यांनी दिली आहे.