देशाच्या भूदल, नौदल व हवाई दलामध्ये प्रवेश घेऊन राष्ट्राची सेवा करु इच्छिणाऱ्या आणि चमकदार आयुष्य जगू इच्छिणाऱ्या उमेदवारांना यासंबंधीच्या अभ्यासक्रमांविषयी व त्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परिक्षांसंबंधीची माहिती या लेखात दिली आहे तरी गरजूंपर्यंत ती जास्तीत जास्त पोहोचली पाहिजे यासाठी शेअर करा.
दहावी आणि बारावीचे निकाल लागू लागले की, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडणारा मोठा प्रश्न म्हणजे पुढे काय ? बहुतेक वेळा या परिक्षांमध्ये मिळणाऱ्या टक्केवारीवर पुढील भवितव्य ठरविण्याकडे कल असतो. त्यातही विशेष ओढा असतो तो वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि आता स्पर्धा परीक्षांकडे. परंतु या परिक्षांमध्ये अपेक्षेएवढे गुण मिळाले नाही, तर विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये नैराश्य निर्माण होते आणि सर्व जीवन अंध:कारमय वाटू लागते. तसेच या अभ्यासक्रमांच्या वाढत्या खर्चामुळे पालक हवालदिल होतात.
परंतु, विद्यार्थी आणि विशेषत: पालकांनी जर डोळसपणे पाहिले तर, त्यांच्या असे लक्षात येईल की, जेथे केवळ दहावी व बारावीतील टक्केवारी तसेच पालकांना काहीही भुर्दंड बसणार नाही, असे अभ्यासक्रम आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. शिवाय हे अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पुढे काय ? हा प्रश्न निर्माण न होता, शाश्वत, प्रतिष्ठित व देशासाठी गौरवशाली आयुष्य जगण्याची संधी मिळते. अशा या काही अभ्यासक्रमांची माहिती करुन घेऊन शालेय जीवनापासूनच आपल्या कारकिर्दीचे नियोजन केल्यास पुढील वाटचाल ही निश्चितच सुखद व सुकर होते. म्हणून भारतीय सेनादलांशी संबंधित असलेल्या पुढील चार प्रमुख संस्थांची माहिती करुन घेणे उपयुक्त ठरेल.
विशेषत: या चारही संस्था महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातच आहेत. या संस्था म्हणजे (1) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला (2) सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय, खडकी (3) नाविक अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणावळा (4) सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे.
1) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला - महाराष्ट्राचे शिल्पकार कै.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या प्रबोधिनीत प्रवेश मिळणे हे अत्यंत सन्मानाचे समजले जाते. प्रबोधिनीतून यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची पुढे भूदल, नौदल आणि हवाईदलात अधिकारी म्हणून निवड होते.
येथील तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, विषयांनुसार बी.ए. वा बी.एस्सी. ही पदवी मिळते. त्यानंतर सेनादलाच्या इंडियन मिलिटरी ॲकेडमी, डेहराडून; इंडियन नेव्हल ॲकेडमी, केरळ आणि इंडियन एअरफोर्स ॲकेडमी, हैद्राबाद या तीनपैकी एका विशेष प्रबोधिनीत एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड होते. त्यात शेवटच्या सहा महिन्यात आकर्षक असे विद्यावेतनही मिळते.
या प्रबोधिनीत दर महा महिन्याला जवळपास 400 विद्यार्थी घेतले जातात. कला, वाणिज्य वा शास्त्र विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रबोधिनीच्या स्पर्धा प्रवेश परीक्षेला बसू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी ही परीक्षा दरवर्षी एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. येथे प्रवेशासाठी 15 महिने आधी अर्ज करावा लागतो. परीक्षेची प्रश्नपत्रिका ही पाचवी ते बारावी दरम्यानच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. लेखी परीक्षा व व्यक्तिमत्व चाचणी हे दोन प्रमुख घटक या परिक्षेत असतात. लेखी परिक्षेत 300 गुणांचा गणित व 600 गुणांचा विज्ञान असे दोन पेपर असतात. तर व्यक्तिमत्व चाचणीत मानसशास्त्रीय कसोटी, गटचर्चा, लष्करी नियोजनाची क्षमता आणि नेतृत्वगुण पाहिले जातात. यासाठी निवड मंडळापुढे मुलाखत होत असते. उमेदवाराचे वय साडेसोळा ते साडेएकोणीस या दरम्यान असावे. दृष्टी निर्दोष असावी व तब्येत सुदृढ असावी.
2) सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय, खडकी - या महाविद्यालयात दर सहा महिन्यांनी 75 विद्यार्थी घेतले जातात. भौतिक, रसायनशास्त्र व गणित विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्पर्धा परिक्षेला बसण्यास पात्र असतात. या महाविद्यालयातून यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालयाची बी.टेक. ही पदवी मिळते. या पदवीनंतर भारतीय लष्करात अधिकारी बनण्याची संधी प्राप्त होते.
3) नाविक अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणावळा - या महाविद्यालयात दर सहा महिन्यांनी 75 विद्यार्थी घेतले जातात. शैक्षणिक पात्रता ही भौतिक, रसायनशास्त्र व गणित हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण अशी आहे. याशिवाय जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयाची बी.टेक. ची पदवी मिळते. त्यानंतर नौदलात अधिकारी म्हणून निवड होते.
4) सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे - या वैद्यकीय महाविद्यालयात दरवर्षी 130 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यापैकी 30 टक्के जागा या मुलींसाठी राखीव आहेत. भौतिक, रसायन व जीवशास्त्र हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असावी लागते. याशिवाय नॅशनल इलिजिबिलीटी टेस्ट उत्तीर्ण व्हावी लागते. येथील अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर एम.बी.बी.एस. ही पदवी मिळते व पुढे सेनादलात सेवेची संधी प्राप्त होते.
वरील सर्व अभ्यासक्रमांची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे उमेदवारांना काहीही फी भरावी लागत नाही. शिवाय सरकारी खर्चात भोजन व वसतीगृहाची व्यवस्था होत असते. उमेदवार शिस्तशीर व चमकदार आयुष्य जगू शकतात.
सौजन्य - विकासपिडिया