पेठ वडगाव - सुहास गोदे
वडगाव शहराची बारा कोटी साठ लाख रुपयेची वाढीव पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून मंजूर झाली असून या योजनेच्या मंजुरीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे मंत्रालयात नुकतेच दिले आहे. या योजनेमुळे वडगाव शहरातील वाढीव उपनगराचा तसेच वडगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याची माहिती वडगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वडगाव नगरपरिषदेची बारा कोटी साठ लाख रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याची व शहरात युवक क्रांती महाआघाडीच्या सव्वा वर्षाच्या काळात अल्पावधीत सुमारे ३० कोटींची विकास कामे मार्गी लावल्याबाबत माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष माळी बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थित युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष अजय थोरात, नगरसेवक कालिदास धनवडे, संतोष गाताडे, संदीप पाटील, संतोष चव्हाण, शरद पाटील, गुरुप्रसाद यादव, प्रजापती सनदी, नगरसेविका शबनम मोमीन, नम्रता ताईगडे, अलका गुरव, मैमुन कवठेकर, मुख्याधिकारी अतुल पाटील ,प्रा.अविनाश तेली,राजू कवठेकर,सुनील माने,अमित मनेर आदी प्रमुख उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी वडगाव शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या या वाढीव पाणी योजनेच्या मंजुरीसाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, आमदार सुरेश हाळवणकर, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, यांचे सहकार्य लाभले असून त्यांचे वडगावच्या जनतेच्यावतीने त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष माळी यांनी महाआघाडीची सत्ता वडगाव पालिकेवर आल्यानंतर वडगाव शहरासाठी महत्वपूर्ण असलेला वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल झाला असल्याचे सांगितले. तर हा प्रस्ताव नगराध्यक्ष माळी व मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या सहीने शासनाच्या नगरोत्थान योजनेतून मंजुरीसाठी दाखल केला आहे असे सांगून प्रस्तावाची प्रत पत्रकारांसमोर सादर करण्यात आली.
या योजनेतून वडगावचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून यामध्ये मौजे तासगाव रोड इंदिरा वसाहत येथे एक टाकी तर कोल्हापूर रोड येथे न्यायालयासमोर एक टाकी तसेच एक फिल्टर हाऊस, वारणा नदीवरून बारा इंची पाइपलाइन, शहरातील व वाढीव उपनगरामध्ये पाईपलाईन अशी कामे होणार आहेत.
यावेळी नगराध्यक्ष माळी यांनी माहिती देताना म्हणाले, युवक क्रांती महाआघाडीच्या सव्वा वर्षाच्या सत्ताकाळात अल्पावधीत विविध विकास योजनातून सुमारे तीस कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. यामध्ये १२ कोटी ६० लाख रुपयांची पाणी योजना, २ कोटी २५ लाख रुपयांची संभाजी उद्यान, ४ कोटी ५० लाख रुपयांची शहरातील रस्त्यांची कामे, घनकचरा प्रकल्प २ कोटी ६९ लाख , दलित वस्ती विकासकामा करीता १ कोटी, विद्या कॉलनी कम्पोस्ट डेपो कम्पाउंडसाठी ४० लाख, भाजी मार्केट शॉपिंग सेंटर २ कोटी २५ लाख, पाणी मीटर १ कोटी ८० लाख यासह विविध विकासकामे मार्गी लागली आहेत.
वडगाव शहराचे विकासाचे व्हीजन ठेवून युवक क्रांती महाआघाडीचे काम सुरु आहे. यापुढे वडगाव शहराच्या विकासासाठी विविध योजनाकरिता प्रयत्नशील आहोत.
यावेळी सत्ताधारी महाआघडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी आभार मानताना म्हणाल्या, वडगावच्या विकासासाठी वडगाव शहरातील नागरिक व आपणा सर्वांचे सहकार्य लाभत आहे.
फोटो- मुंबई - येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वडगाव शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे पत्र स्विकारताना नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष अजय थोरात, प्रविता सालपे व सर्व नगरसेवक.