शिरोली/ प्रतिनिधी दि. १७/४/१८
अवधूत मुसळे
फोटो
उडान फौंडेशनच्या महिला कार्यकर्त्यासह अॅड उल्का पाटील
मेळघाट मधील दुर्घटनाग्रस्त आदिवासी भागाला उडान फौंडेशनने दिला मदतीचा हात.उडान ने केलेल्या मदतीच्या आवाहनाला कोल्हापूर वासीयांचा भरघोस प्रतिसाद.
अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील सेमाडोह गावातील ढाणा या आदिवासी भागातील सुमारे ४० झोपड्या आग लागल्यामुळे बेचीराख झाल्या. आग लागली त्यावेळी अनेक आदिवासी बांधव शेताच्या कामावर गेले होते. काही आदिवासी इंधन वेचण्यासाठी व काही मोह फुलांना गोळा करण्यासाठी गेले होते. त्यामुळे या आगीत खुप मोठे नुकसान झाले.
ही घटना समजताच उडान फौंडेशन कडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व कोल्हापूर वासीयांना मदतीचे आवाहन केले होते. तुमच्या घरी वापरात नसलेले लहानांपासून ते वृद्धापर्यंतचे कपडे, साड्या, अंथरून- पांघरून, स्वयंपाक घरातील जेवणासाठी वापरली जाणारी भांडी, घागर तसेच तांदूळ, गहू असे धान्य, चपला, स्टेशनरी असे साहित्य जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. फक्त दोन दिवसांच्या कालावधीत कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. कमी कालावधी असताना सुद्धा एक टेम्पो भरून साहित्य जमा झाले.
हे साहित्य जमा करण्यासाठी टेक केयर फौंडेशन आणि सावली फौंडेशन 'यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले. शनिवारी हे साहित्य पुण्यातील समाजबंध या संस्थेकडे सुपूर्त करण्यात आले. तिथून हे साहित्य मेळघाट मधील दुर्घटनाग्रस्त ठिकाणी पोहोचवले जाणार आहे.
कोणत्याही राजकीय पाठिंब्याशिवाय उडान फौंडेशनने अल्पावधीत केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी उडान फौंडेशनचे अध्यक्ष भुषण लाड, हरेश वाधवानी सौ. मनाली वीरकर, आराध्या सावंत, प्राजक्ता चव्हाण, सौ. सारीका सुर्यवंशी, सौ. रेखा उगवे, अॅड. उल्का पाटील, नम्रता मालानी, अमृता मालानी, सौ. संजोगीता सातपुते, माधवी टिके उपस्थित होत्या.