प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित शिक्षक आमदार यांनी केले तोंडभरून कौतुक.
हेरले / प्रतिनिधी
*आभाळमाया ही सामाजिक, शैक्षणिक सेवाभावी संस्था म्हणजे सामाजिक बांधिलकीचे महाराष्ट्रातील एक विलक्षण प्रेरणादायी उदाहरण असल्याचे प्रतिपादन या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनी उपस्थित शिक्षक आमदार यांनी केले. कोल्हापूर शिक्षक सहकारी बँकेच्या संचालिका लक्ष्मी पाटील यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या आभाळमाया या सामाजिक आणि शैक्षणिक सेवाभावी संस्थेचा प्रथम वर्धापन दिन छत्रपती शाहू महाराज स्मारक भवनात संपन्न झाला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती श्रीमती रसिका अमर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आभाळमाया राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.संस्थेमार्फत शिक्षकांसाठी राज्यस्तरीय काव्यगायन स्पर्धाही घेण्यात आली होती त्या स्पर्धेतील विजेत्या कवींना ही पुरस्कार प्रदान करण्यात आले.अत्यंत रचनातम शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हाती घेऊन हा नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला.
श्रीमती संगीता पुंड या दिव्यांग (नेत्रांध) शिक्षिकेने आपल्या तेजस्वी आणि डोळस कार्याने शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जे वैभवशाली यश मिळवून दिले आहे त्या विलक्षण प्रेरणादायी घटनेचा सर्वांनी विशेष उल्लेख करून त्यांचा आभाळमाया आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला. कोरोना काळात अत्यंत प्रतिकुलाशी टक्कर देत असामान्य शैक्षणिक कार्य केलेल्या शिक्षक बंधू भगिनीचा या वेळी आभाळमाया आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय काव्य गायन स्पर्धेतील विजेत्या शिक्षक बंधू भगिनींना या वेळी स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशाताई उबाळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हा नेहमी आघाडीवर का असतो याचे रहस्य आज उलगडल्याचे आपल्या भाषणात सांगितले.प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे नेते मोहनराव मामा भोसले यांनी या कार्यक्रमाच्या कल्पक आयोजक आणि आभाळमाया या सेवाभावी संस्थेच्या प्रवर्तक लक्ष्मी पाटील यांचा आत्मनिर्भर स्त्री शक्ती या शब्दात गौरव करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. समाजभान समूहाचे संस्थापक विश्वास सुतार यांनी आभाळमायेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे समाधान मिळाल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य मधुकर पाटील यांनी आभाळमाया या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आणि आदरणीय असल्याचे प्रतिपादन केले. सन्मानित शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले. तासगाव अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थतज्ञ श्रीकांत कुलकर्णी यांनी आभाळमाया करत असलेल्या असाधारण सामाजिक कार्याचा वसा राज्यातील इतर संस्थांनी घ्यावा असे आवाहन केले.
या राज्यस्तरीय कार्यक्रमात बहारदार कवितांचे सादरीकरण करण्यात आले. आभाळमाया या संस्थेच्या वतीने निराधार व्यक्तीला आधार दिला जातो. यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांना अनाथ मुलांना शालेय दप्तर आणि शालेय साहित्य प्रदान करण्यात आले आहे. याचा अनेक शिक्षकांनी अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख आपल्या भाषणात केला.सत्कारमूर्ती शिक्षकांनी आभाळमाया राज्यस्तरीय पुरस्काराने आपण भारावून गेल्याचे सांगून अध्ययन अध्यापन क्षेत्रात आता अधिक प्रेरणेने कार्य करण्याचा संकल्प केला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती श्रीमती रसिकाताई पाटील यांनी आभाळमाया या आदर्श सामाजिक सेवाभावी संस्थेच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभ्या असल्याचे प्रतिपादन करून संस्थेच्या आणि विशेषतः श्रीमती लक्ष्मी पाटील यांच्या प्रेरक कार्याचे कौतुक केले.आभाळमाया या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या भावी कार्यासाठी मोहन मामा भोसले यांनी पाच हजार रुपये , नामदेवराव चौगुले यांनी तीन हजार रुपये, ग. ल.कुंभार यांनी दोन हजार पाचशे रूपयांची देणगी प्रदान केली.सत्कारमूर्ती शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून आपल्या उत्तम कार्याची तिथेच पावती दिली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षक आणि रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थितीमुळे कार्यक्रम स्थळ भरगच्च भरून गेले होते. या वेळी समारभांच्या आयोजक श्रीमती लक्ष्मी पाटील यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सचिव अजित वारके आणि आपल्या आई वडील आणि आपले पती बाजीराव पाटील यांच्या सहकार्याचा आवर्जून कृतज्ञता पूर्वक उल्लेख केला.महाराष्ट्रातील शिक्षक,विविध संघटनांचे पदाधिकारी..प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक बँक सभासद ,कर्मचारी ,व आपल्या शाळेने मला भरीव सहकार्य केल्याची भावना आयोजक श्रीमती लक्ष्मी पाटील यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश घोटणे आणि डॉ .स्वाती पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या उपाध्यक्षा सविता पाटील यांनी केले.
फोटो
आभाळमाया सामाजिक, शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षक सोबत शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर अध्यक्षा लक्ष्मी पाटील व अन्य मान्यवर.