हेरले / प्रतिनिधी
महावितरण शेतक-यांना रात्री वीज देत असल्याने शेतक-यांना वीजेचा शॅाक लागून , गवा , बिबट्या , अस्वल , हत्ती यासारख्या वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू होऊन आमच्या माता भगिनी विधवा होत आहेत. यामुळे राज्यातील शेतक-यांच्या पत्नीचे मंगळसुत्र व कुंकवाचे रक्षण करण्यासाठी सरकारने शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा. अशी मागणी स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.
कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर गेल्या ७ दिवसापासून शेतीपंपास दिवसा वीज द्या या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने कोल्हापूर महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. अंकुर कावळे यांना महिलांनी मंगळसुत्र , कूंकू व बांगड्या देऊन यांचे रक्षण करा अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना जि. प. सदस्या सौ. पद्माराणी पाटील म्हणाल्या कि शेतक-यास रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी पाजविण्यासाठी जावे लागत आहे. राज्यात दैनंदिन एखादा शेतक-याचा वीजेच्या शॅाकने अथवा वन्यप्राण्यांच्या हल्याने जीव जात आहे. यामुळे शासनाने तातडीने याबाबत शेतीस दिवसा १० तास वीज देण्याचा निर्णय घ्यावा. निमशिरगाव ग्रा. प. सदस्या सौ. वैशाली पाटील बोलताना म्हणाल्या कि सरकार शेतक-यांना रात्री वीज देत असल्याने घरातील प्रमुख जबाबदार व्यक्ती दररोज पाणी पाजण्यासाठी शिवारात जात असतात दररोज त्यांना वन्यप्राणी यांच्यापासून जीवितास धोका आहे. आजपर्यंत राज्यातील हजारो शेतक-यांचा यामध्ये जीव गेला आहे. यामुळे राज्यातील संपुर्ण महिला शेतक-यांच्यावतीने आपण आमच्या या भावना सरकारला पोहोचवून संपुर्ण राज्यातील शेतक-यांच्या माता भगिनीचे विधवा होण्यापासून रक्षण करावे याकरिता आज आम्ही आणलेले हे मंगळसुत्र, कुंकू व बांगड्या सरकारकडे पाठवून आमच्या भावना कळविण्यात याव्यात.
यावेळी जि. प. सदस्या शुभांगी शिंदे , परितेच्या पंचायत समिती सदस्य जयश्री पाटील , सौ. संगीता शेट्टी , सौ. सन्मती पाटील , श्रीमती. सुवर्णा पाटील यांचेसह निमशिरगाव , जयसिंगपूर , परिते , शिरोळ , हातकंणगले व करवीर तालुक्यांतील महिला उपस्थित होत्या.