हेरले / प्रतिनिधी
मौजे वडगाव( ता. हातकणंगले) येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाण पासून सुरू न केल्यास शेतकरी व गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले. त्यांच्याशी फोनवरून संभाषण झाले असता त्यांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता पोळ यांनी त्यांच्या आदेशानुसार निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे वडगाव येथील गावठाण ते पाझर तलाव रस्त्याची सुधारणा गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून होत आहे .सदर रस्त्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी विनामोबदला जमिनी दिल्या आहेत .सदर रस्त्याचा ग्रामपंचायत ग्रामसभा ठरावानुसार कामाची वर्क ऑर्डर गावठाण पासून पाझर तलावापर्यंत अशी आहे. परंतु ठेकेदाराने व गावातील तथाकथित पुढाऱ्यांनी सुरुवातीचे अंतर सोडून पुढचा रस्ता सुरू केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले त्यामुळे ठेकेदाराने रस्त्यासाठी लागणारी यंत्र सामग्री घेऊन गेले.
दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी व खासदार धैर्यशील माने तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जि. प. बांधकाम विभागाला पत्राद्वारे वर्क ऑर्डर नुसार रस्त्याचे काम गावठाण पासून सुरु करावे असे लेखी पत्र दिले. तदनंतर बांधकाम उपविभाग हातकणंगले यांनी ग्रामपंचायत मौजे वडगाव यांना दि.१४/१/२०२२ रोजी लेखी पत्र देऊन गावठाण पासून रस्त्याची हद्द निश्चित करून घ्यावी असे कळविले परंतु सव्वा महिना होऊन गेले तरी ग्रामपंचायतीने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम गावठाण पासून सुरु करावे अन्यथा २ मार्च २०२२ रोजी शेतकरी व गावातील पदाधिकारी यांच्या वतीने सामूहिक आत्मदहन करीत आहोत. याची नोंद घ्यावी सोबत वर्क ऑर्डर ची झेरॉक्स प्रत, खासदार धैर्यशील माने यांचे बांधकाम विभागाला दिलेले लेखी पत्र, बांधकाम उपविभाग हातकणंगले यांनी ग्रामपंचायतीला दिलेले लेखी पत्र जोडत असून माहितीसाठी प्रत मा. पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर मनोहर चौगले, गुणधर परमाज, बाळासो थोरवत, मधुकर अकीवाटे, सुरेश कांबरे, स्वप्नील चौगुले, सुनील खारेपाटणे, यांच्या सह्या आहेत.
फोटो
मौजे वडगाव येथील रस्त्या संदर्भात आत्मदहन करीत असल्याचे निवेदन जि .प .चे उपकार्यकारी अभियंता पोळ साहेब यांना देताना शेतकरी व पदाधिकारी.