कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासकीय ,निमशासकीय व शिक्षक,शिक्षकेत्तर समन्वय समितीने २३ व २४ फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या राज्यव्यापी संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहभागी होणार असल्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने शनिवारी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभावन येथील कार्यलयात झालेल्या सभेत घेतला .सभेच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते .
सेवेत असलेल्या सर्वाना जुनी पेंशन योजना लागू व्हावी व अन्य शैक्षणिक समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी हा संप होत आहे .
वरील दोन दिवसाचे शालेय कामकाज रविवार दिनांक 27 फेब्रुवारी व रविवार दिनांक 6 मार्च 2022 रोजी शाळा सुरू ठेऊन पूर्ण केले जाईल . या सभेत कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार100%अनुदान मिळावे,अघोषित शाळा त्वरित शासनाने घोषित करून अनुदानाची तरतूद करावी, काही शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्सर त्रास दिला जात आहे अशा सेवकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करणे तसेच नवीन शाळा सुरू करण्यासाठी बृहत आराखड्यानुसार परवानगी द्यावी,प्रयोगशाळा परिचर यांच्या समस्या शासनाने त्वरित सोडवाव्यात ,यावर सभेत निर्णय घेण्यात आले .या सभेस बी. जी. बोराडे, ,खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील,दादासाहेब लाड,भरत रसाळे, इरफान अन्सारी, आर. वाय. पाटील, सी एम गायकवाड , काकासाहेब भोकरे , सुधाकर निर्मळे,बी. डी. पाटील,समीर घोरपडे,राजेंद्र सूर्यवंशी, पी. एस. हेरवाडे,मनोहर जाधव , बी. एस. खामकर,शिवाजी माळकर , अरुण मुजुमदार ,जगदीश शिर्के, जयसिंग देवकर, आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.