हेरले / प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठाकडून अध्यक्ष संजयजी घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २८ फेब्रुवारीला कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ''एसजीयु आयकॉन'' हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी साहित्य क्षेत्रातून सोनाली नवांगुळ, क्रीडा क्षेत्रातून अनुजा पाटील, उद्योग क्षेत्रातून दादू सलगर, शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातून प्रकाश गाताडे, सामाजिक सेवा क्षेत्रातून संदीप परब यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तसेच या पुरस्काराचे वितरण दि.२८ फेब्रुवारी रोजी संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे याठिकाणी होणार आहे अशी घोषणा विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी आज केली यावेळी कुलगुरू डॉ.अरुण पाटील व प्राचार्य विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनाली नवांगुळ यांनी साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. स्वतः अपंग असूनही हेल्पर्स ऑफ हॅंडीकॅप संस्थेत सोशल वर्कर म्हणून काम केले.त्यांनी अनेक पुस्तकांचे भाषांतर व स्वतंत्र लिखाण केले आहे. कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या अनुजा पाटील यांनी महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाचे कर्णधार व भारतीय महिला क्रिकेट सदस्य म्हणून भरीव कामगिरी केली आहे. दादू सलगर हे सलगर अमृततुल्य चहा चे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या जवळपास भारतभर २५० शाखा आहेत. प्रकाश गाताडे हे कोल्हापूरचे असून पेशाने शिक्षक आहेत. उमेद सेवा फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गरीब व वंचितांसाठी कार्य केले आहे. संदीप परब हे २००७ पासून जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून बेघर झालेल्या व्यक्तीसाठी झटत आहेत.याचबरोबर एड्सग्रस्त लोक व त्यांच्या मुलांसाठी सुद्धा त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून आधार देण्याचे कार्य केले आहे.