शिक्षण विभागातील प्रश्नांचा निपटारा करण्यासाठीची बैठक कोल्हापूरात संपन्न.
कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अंतर्गत (प्राथमिक व माध्यमिक) प्रलंबित कामांचा आढावा घेणेसाठी राज्याचे शिक्षण संचालक यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील न्यू कॉलेज मध्ये आढावा बैठक बुधवार दि. २३ फेब्रुवारी रोजी पार पडली. बैठकीमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक समस्यांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीमध्ये बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले , शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दुर्दैवाने शासन पातळीवर प्रलंबित राहत आहेत , त्याचा निपटारा करण्यासाठी राज्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण संचालकांच्या उपस्थितीमध्ये प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या बैठकीचे प्रथमच आयोजन केले असून ही बैठक संपूर्ण राज्याला दिशा देणारी असेल .
या बैठकीत शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर म्हणाले या ठिकाणी प्रश्नांची सोडवणूक केली जाणार असून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी या बैठकीचा मोठा फायदा होणार आहे. जे प्रश्न प्रलंबित राहतील त्याच्यासाठी विशिष्ट कालावधी दिला जाणार असून त्या कालावधीतच या प्रश्नांची सोडवणूक करणे संबंधीतावर बंधनकारक राहणार आहे. सर्वांना न्याय देण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे.
शिक्षण क्षेत्र निकोप करण्यासाठी अधिकारी वर्गाच्या मदतीने प्रयत्न केले जाणार आहेत.
राज्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर म्हणाले, शिक्षण संचालनालय विभागाच्यावतीने प्रशासन गतिमान केले जाणार असून विभागाचा कारभार पारदर्शक करणार आहोत. लवकरच प्रलंबित प्रश्नांची निर्गत केली जाणार आहे. संच मान्यता प्रक्रियेमध्ये बदल करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. लवकरच त्यानुसार संच मान्यतेची कार्यवाही करून संभ्रमावस्था दूर केली जाईल. त्यांनी या विषयावर शिक्षण आयुक्त यांच्याशी या बैठकी मधूनच भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.
राज्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर टेमकर म्हणाले ,शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विषयीच्या तक्रारी असतील त्या लिखित स्वरूपात द्याव्यात त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. शिक्षण क्षेत्रातील समस्या त्यांची सोडवणूक करण्यासाठी आयोजित केलेली ही राज्यातील पहिलीच अशा प्रकारची बैठक दोन आमदारांच्या उपस्थितीमध्ये होत असून त्याचा निश्चितच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपयोग होईल.
प्रास्ताविक शिक्षण सहसंचालक सुभाष चौगुले यांनी केली. शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी उपस्थितांचे स्वागत केले . त्यानंतर माध्यमिकचे शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर , प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे , वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के , प्राथमिक वेतन पथक प्रभारी अधीक्षिका वसुंधरा कदम , सिनियर ऑडीटर सागर वाळवेकर यांनी आपल्या विभागाचा आढावा सादर केला.
त्यानंतर विविध संघटनांच्या प्रमुखांनी प्रलंबित प्रश्न या बैठकीमध्ये मांडले. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ , बाबासाहेब पाटील , खंडेराव जगदाळे, बी.डी. पाटील यांच्यासह उपस्थित अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यामध्ये कामांची चेकलिस्ट द्यावी व प्रत्येक कामांचा कालावधी निश्चित करावा, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी व्हावी , संचमान्यता मधील त्रूटी दूर कराव्यात , मेडीकल बिलामध्ये व सेवानिवृत्ती फंडामधील टक्केवारी घेण्याची पद्धत बंद करावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
उपस्थित केलेल्या केलेल्या प्रश्नांची निर्गत लवकरात लवकर करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित दोन शिक्षण संचालक, दोन शिक्षणाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी दिले. प्राथमिकचे राजाराम वरुटे , मोहन भोसले , सखाराम राजूगडे यांनी प्राथमिक शिक्षकांशी संबंधित प्रश्न यावेळी उपस्थित केले. त्यामध्ये अतिरिक्त पदवीधर शिक्षकांचे प्रश्न , विज्ञान शिक्षक नियुक्तीसह इतर प्रश्नांचा समावेश होता.
शिक्षण उपनिरीक्षक रवी चौगले,
उपशिक्षणाधिकारी बी. एम. किल्लेदार, डी एस पोवार ,गजानन उकिर्डे ,भिमराव टोणपे यांच्यासह शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, के. जी. पाटील,बी. जी. बोराडे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे,खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, उदय पाटील, के. के. पाटील, सुधाकर निर्मळे,आर. डी. पाटील. डॉ.डी .एस .घुगरे, प्राचार्य एन. आर. भोसले, मिलींद बारवडे, भाऊसाहेब सकट, जावेद मणेर , संदीप पाथरे, समीर घोरपडे, मिलींद पांगिरेकर ,इरफान अन्सारी, संतोष आयरे, मोहन भोसले, राजाराम वरुटे, पंडीत पोवार, संतोष आयरे, राजेंद्र कांबळे आदी संघटना प्रमुख पदाधिकारीसह प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विभागातील प्रलंबित कामांच्या आढावा बैठकीत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर सोबत शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर , शिक्षण संचालक महेश पालकर, दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, एस डी लाड व इतर मान्यवर.