कोल्हापूर दि. 19 :- पन्हाळगडावरुन सांगलीला शिवज्योत घेऊन जाणाऱ्या वाहनास नागाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची तसेच अपघातील जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. अपघातातील मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने 5 लाखांची मदत यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली.
सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सालाबादप्रमाणे पन्हळा येथून शिवज्योत घेऊन सांगलीकडे आज पहाटे जात होते. नागावफाट्याजवळ त्यांच्या वाहनास झालेल्या अपघातात यातील पाच विद्यार्थी मयत झाले तर 18 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमीमधील 3 विद्यार्थी गंभीर आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर सीपीआरमध्ये उपचार सुरु असून जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना तसेच नातेवाईकांना धीर दिला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्देवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करुन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना दु:खद अंतकरणाने श्रध्दांजली वाहिली. ही घटना दुर्देवी असून नियतीने शिवज्योत घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर दुर्देवी घाला घातला. यातील मयत झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत शासनाच्यावतीने त्यांनी जाहीर केली. तर जखमी विद्यार्थ्यांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया तसेच औषधोपचारासाठी जे जे करावे लागेल ते केले जाईल, अशी ग्वाही दिली. सीपीआरमधील डॉक्टरांनी यासाठी सर्वते योगदान द्यावे, शस्त्रक्रिया व अन्य औषधांसाठी जी जी मदत लागेल, ती मदत केली जाईल. जखमी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार प्रसंगी खासगी दावाखान्याचीही मदत घेतली जाईल. त्यासाठी येणारा सर्व खर्च केला जाईल.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, समाजात उत्सव वाढत आहेत. उत्सव साजारे करणे चांगलेच आहे. मात्र उत्सव साजरे करताना दक्षता घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तितकेच गरजेचे आहे. यामध्ये संपूर्ण समाजघटकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, राजर्षी शाहु छत्रपती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, समीर शिंगटे, तहसिलदार उत्तम दिघे यांच्यासह सर्व संबधित अधिकारी, डॉक्टर्स उपस्थित होते.