कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गात नवव्या स्थानावर आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. मे महिन्यात केवळ दोन अंकी बाधित संख्या असणाऱ्या कोल्हापूरची रुग्ण संख्या तब्बल तीस हजार कशी झाली याचे उत्तर नाही. जवळपास हजारावर मृत्यू निव्वळ कोरोना मुळे झाले आहेत. पण लोकांना अजूनही काही गांभीर्य नाही असे वाटते.
जिल्हयातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील अनेक नागरिक, लोकप्रतिनिधी, मोठे व्यापारी यांनी शहरात जनता कर्फ्यू लागू करावा, अशी मागणी करत आहेत . मात्र यास अनेक छोटे-मोठे भाजीपाला, फळविक्रेते, व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला आहे. याला अनुसरून सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत. यामुळे कोल्हापूरात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करणार असे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच केवळ सहा दिवसांचा आणि पोकळ, दिखाऊ जनता कर्फ्यू न लावता कडक अंमलबजावणी करण्यात यावी असाही सुर नागरिकांमध्ये उमटत आहे.
मागील लॉकडाऊन वेळी दुचाकी व चारचाकी वाहने बिनधास्त फिरत होती. एमआयडीसी व इतर ठिकाणी कामगार कामाला जात होते. लोक खरेदीसाठी गर्दी करत होते. त्यामुळे असाच जनता कर्फ्यू असेल तर त्याचा उपयोग काय ?
म्हणून जनता कर्फ्यू लागू करणार असाल तर दुध आणि वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व बंद म्हणजे कडक बंद करायला हवे अशी मागणी होत आहे.