हेरले प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेने दि. ८ एप्रिल रोजी हातकणंगले बसस्थानकासमोर झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्था व तसेच त्याच्या दुरुस्ती संदर्भात शासनाला निवेदन दिले होते व २० एप्रिल पर्यंत सर्व कामे पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याचीच दखल घेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री.व्ही.डी. पंदरकर यांनी ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे पत्र विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद प्रशासनाला दिले.
शिरोली ते अंकली रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी व इतर अनुषंगिक कामासाठी निविदाद्वारे ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मौजे हातकणंगले येथील रस्त्याच्या झालेल्या दुरुस्ती बाबतचे काम आय आर सी च्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरु करून संबंधित ठेकेदारास रस्ते सुस्थितीत ठेवण्यासंदर्भात आवश्यक सूचना कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत असे श्री. पंदरकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या मार्गावरच अतिग्रे याठिकाणी संजय घोडावत विद्यापीठाचा कॅम्पस आहे. या विद्यापीठात जवळपास १६ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मार्गावर सतत या शिक्षण संकुलात शिकणारी मुले, शिक्षक व इतर स्टाफ त्यांच्या वाहनाने ये-जा करत असतात. हातकणंगले बस स्थानकासमोरील या राज्य महामार्गाची सध्या दुरावस्था झाल्यामुळे जयसिंगपूर व सांगली परिसरातून येणाऱ्या विद्यार्थी व स्टाफ ना तसेच परिसरातील नागरिकांनादेखील दररोज नाहक त्रास होत आहे. तसेच हातकणंगले येथे या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे की दुचाकी चालविणाऱ्याना दररोज अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या सर्व होणाऱ्या त्रासामुळे विद्यार्थ्यांनी या संदर्भात निवेदन दिले होते. २०१४ साली अंकली टोल नाक्यावर हाच मार्ग सुस्थितीत करण्यासाठी शिक्षण संकुलाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी आंदोलन केले होते.
प्रशासनाने घेतलेली दखल लक्षात घेता विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेने २० तारखेनंतर होणारे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. परंतु १ मे पर्यंत जर रस्ते दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण होऊन रस्ता सुस्थितीत झाला नाही तर मात्र विद्यापीठाचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व विद्यापीठ व्यवस्थापन यांनी हातकणंगले येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याबाबतचा निर्णय घेतला आहे.