हेरले / प्रतिनिधी
पुलाची शिरोली येथील अंबिका ट्रेडर्स या गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री साडे बाराच्या सुमारास लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी आठ अग्निशमन टँकर सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रयत्न करत होते. आगीची भीषणता एवढी होती की यामध्ये छताला असणारे लोखंडी अँगलही वितळले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण आग लवकर आटोक्यात येत नसल्याने शेजारी असणार्या दुसर्या गोदामामध्ये आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. अंबिका ट्रेडर्स चे मालक लालजी रामजी भानुशाली यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : कोल्हापूर - सांगली मार्गावर पुलाची शिरोली येथील श्री सिमंधर धाम जैन मंदिरासमोर मार्बल लाईनला अंबिका ट्रेडर्स हे बारदानाचे गोदाम आहे. भानुशाली कुटुंबातील हा व्यवसाय असल्याने त्याला लागूनच त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची गोदामेही आहेत. अंबिका ट्रेडर्सला लागून असणार्या वीजेच्या खांबावर रात्री साडे बाराच्या सुमारास स्पार्किंग झाले. त्यामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे अंबिका ट्रेडर्स या गोदामाला आग लागली. काही कळण्या अगोदरच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यानंतर कोल्हापूर, पेठवडगाव व इचलकरंजी येथील आठ अग्निशमन दलाच्या टँकरना पाचारण करण्यात आले. सभोवती टँकरने पाणी फवारणी सुरू होती. तरीही आग आटोक्यात येण्यासाठी तब्बल दहा तास लागले. गोदामात उंचच्या उंच रचून ठेवलेली शेकडो टन बारदाने यात जळून खाक झाली. शिवाय छप्पराला असणारे लोखंडी अँगलही वितळले. यामुळे मोठे नुकसान झाले. आगीचे लोट आणि झळांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांनाही दूर राहून पाणी मारावे लागत होते. आज दिवसभर नुकसानीचा अंदाज घेऊन याबाबत शिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
.....................
फोटो
शिरोली : येथील अंबिका ट्रेडर्स या गोदामाला लागलेली भीषण आग व झालेले नुकसान.
........................................................................................