हेरले / प्रतिनिधी
कोरानाचा संसर्ग कमी झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी हेरले (ता. हातकणंगले) येथे संयुक्त बौध्द समाज जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 'बोलो रे बोलो जय भीम बोलो ' असा जयघोष करत मंगलमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अवघे गाव भीममय झाले होते.
मिरवणूकीचे उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.प्रतिमा पूजन सरपंच अश्विनी चौगुले यांच्या हस्ते व ध्वजारोहण रंजित कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, पोलिस निरीक्षक के. एन. पाटील,माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, माजी सभापती राजेश पाटील, रोहन पाटील,संदीप चौगुले, ग्राम पंचायत सदस्य बटूवेल कदम, आशा उलसार, आरती कुरणे, संजय खाबडे,प्रा. प्रभुदास खाबडे, जालिदंर उलसार , रवी चौगुले, रणजित खाबडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अशी माहिती संदीप चौगुले यांनी दिली.
हेरले येथील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे पूजन केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवाची गिते गायकांनी बँजोच्या माध्यमातून व बॅन्डच्या मधूर सुरातून सादर केली. लेसर शो, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेच्या तालावर आंबेडकरी कार्यकर्ते बेभान होऊन नाचले. निळे झेंडे, पांढऱ्या साड्या, निळे फेटे परिधान केलेल्या महिला, पुरुषांसह अबाल वृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले होते.
फोटो
हेरले येथे विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांच्या सत्कार प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील, रोहन पाटील व अन्य मान्यवर.