हेरले / प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिस या विभागासाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये हेरले (ता. हातकणंगले) येथील शीतल अरुण व्हटे (मुळ गाव सांगोला) यांची 'सब डिवीजनल वॉटर कंजरव्हेशन ऑफिसर 'अ' वर्ग ' पदी निवड झालेने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
शीतल अरुण व्हटे यांची ' सब डिवीजनल वॉटर कंजरव्हेशन क्लास वन ऑफिसर' पदी निवड झालेने त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या माझ्या या यशामध्ये शालेयस्तर व कॉलेज स्तरावरील शिक्षकांचे मार्गदर्शन मौलीक ठरले. आई-वडिलांनी आहोरात्र केलेल्या कष्टमय जीवनातून मला उच्च शिक्षण देण्यासाठी धडपड सुरू ठेवून या पदापर्यंत पोहचविले, शिक्षकांचे व आई वडिलांचे माझ्या आयुष्यातील योगदानाची कृतज्ञता सदैव ज्ञात ठेवून मार्गक्रमन करणार आहे. या पदाच्या माध्यमातून तलाव बांधणे,बंधारा बांधणे व दुरुस्ती असे कार्य आपल्या अधिकारी पदातून होणार आहे. या कार्याच्या माध्यमातून जलसिंचन क्षेत्राची वाढ व जास्तीत शेती क्षेत्र ओलीता खाली आणून शेतकरी वर्गास जलसिंचनाची सोय करून उत्पादन वाढीच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे.
वडील अरुण व आई संगिता व्हटे यांच्या जेष्ठ कन्या शीतल व्हटे यांचे माहेर
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला गाव आहे.
वडील अरुण व्हटे यांनी गावी चहाची टपरी चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत प्रतिकूल परिस्थीत आपल्या लेकीला बीटेक व एमटेक पर्यंतचे उच्च शिक्षण दिले. त्यांचा लहान मुलगा संदीप व्हटे बीएसी ॲग्री पदवी पर्यंत शिक्षण प्राप्त करून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. दोन्ही मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी प्रचंड कष्ट केले आहे. मुलीने स्पर्धा परीक्षेतून यश मिळवित 'क्लास वन अधिकारी ' पदास गवसणी घालून आई वडिलांच्या कष्टाचे सोने केले.
शीतल व्हटे यांनी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण माध्यमिक सांगोला विद्यामंदीर ज्युनिअर कॉलेज सांगोला या ठिकाणी पूर्ण केले. बीटेक ( सिव्हील )इंजानिअरिंग शिक्षण केआयटी कॉलेज कोल्हापूर, एमटेक ( सिव्हील)चे पदवीत्तर शिक्षण सुरत या ठिकाणी पूर्ण केले. एमटेक शिक्षण पूर्ण झाले नंतर त्यांनी २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली. चौथ्या प्रयत्नात सन २०१९ साली त्यांनी पूर्व व मुख्य परीक्षेत यश संपादन केले. त्यांनी सन २०२२ च्या सुरुवातीस मुलाखत दिली होती. या परीक्षेचा मागील आठवड्यात निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये त्यांची सब डिवीजनल वॉटर कंजरव्हेशन ऑफिसर 'अ वर्ग 'पदी निवड झालेने त्यांच्या माहेर कुटुंबियांना व सासर कुटुंबियांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले.
त्यांचे मागील आठवड्यामध्ये दि. १३ एप्रिल रोजी हेरले ( ता. हातकणंगले) येथील विश्वजीत दादासो कोळेकर यांच्याशी विवाह झाला आहे. पती विश्वजीत यांचे शिक्षण बीटेक झाले असून ते पुणे येथे सॉप्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी करीत आहेत. त्यांच्या लग्ना दिवशीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला व त्या निकालामध्ये शीतल व्हटे यांची सब डिवीजनल वॉटर कंजरव्हेशन ऑफिसर अ वर्ग पदी निवड झाली. त्यांना या दिवशी जीवनसाथी व क्लासवन अधिकारी पद एकच दिवशी प्राप्त झालेने त्यांच्या जीवनामध्ये दुग्ध शर्करा योगायोग जुळून आला.
हेरले (ता. हातकणंगले) येथील दादासो कोळेकर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांनीआपला मुलगा विश्वजीत यास बीई पर्यंतचे उच्च शिक्षण दिले आहे.विश्वजीत पुणे येथे नोकरी करीत आहे. त्यांची पत्नी मिनाक्षी या ग्रामपंचायत सदस्या असून ते व पत्नी दोघेही गावची समाजसेवा करीत आहेत.
या दोन्ही कुटुंबांनी मुलांना उच्च शिक्षण देऊन समाज सेवेचा व्रत जोपासला आहे. या दोन्ही कुटुंबियांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
शितल व्हटे यांचा सत्कार गावातील समस्त धनगर समाजाने केला. या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील, डॉ. विजय गोरड, संदीप चौगुले,प्रा.संतोष कोळेकर ,प्रा. जी. बी. कोळेकर,स्वप्नील कोळेकर,शशिकांत कोळेकर,सुकुमार कोळेकर,आंबाजी कोळेकर ,वडील अरुण व्हटे,आई संगिता व्हटे, भाऊ- संदीप व्हटे,पती विश्वजीत कोळेकर, सासरे दादासो कोळेकर, सासू मिनाक्षी कोळेकर आदी मान्यवरांसह समाज बांधव उपस्थित होते.
फोटो
हेरले : शितल व्हटे यांचा सत्कार गावातील समस्त धनगर समाजाने केला. या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील,प्रा.संतोष कोळेकर ,प्रा. जी. बी. कोळेकर,वडील अरुण व्हटे,आई संगिता व्हटे,सासरे दादासो कोळेकर, सासू मिनाक्षी कोळेकर,पती विश्वजीत कोळेकर, भाऊ संदीप व्हटे आदी मान्यवर.