हेरले / प्रतिनिधी
आजवर शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून संघटनेच्या माध्यमांतून शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करत आलो आहे. मात्र प्रत्येक राजकिय पक्षाने सोयीप्रमाणे आमचा वापर करून घेतला. राज्यांतील महाविकास आघाडी सरकारनेही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. या सरकारकडूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी संघटनेच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत याबाबतची घोषणा केली. त्याचबरोबर संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांचीही पक्षांतून हकालपट्टी केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ऊस एफ आरपी दोन टप्प्यांत, शेतीला दिवसा वीजपुरवठा, पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यासह अनेक मुद्दयांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळत नसल्यांची खंत कार्यकर्त्याकडून व्यक्त होत होती.
त्या पाश्र्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाची राज्यकार्यकारिणीची बैठक हातकणंगले तालुक्यांतील विशाल मंगल कार्यालय चोकाक येथे पार पडली.. केंद्र व राज्य सरकारचे शेतीविषयक धोरणातील फायदे व तोटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील आंदोलनाची पुढील दिशा, स्वाभिमानी पक्षाची राजकीय भूमिका यासह विविध विषयावर दोन सत्राचे चर्चा सत्र पार पडले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शेट्टी यांनी एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी केली असून यावर आमचे आज शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट केले.. दिवसभर मी राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची मते ऐकली. महाविकास आघाडी सोडल्यावर आपण काय करायचे यावर दोन दिवस आमची चर्चा झाली. 2004 पासून आम्ही शेतकरी हा केंद्रबिंदू मानूनच काम करत आहोत. चळवळीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला. ज्या काही आघाड्या केल्या, जे काही निर्णय घेतले ते फक्त शेतकऱ्यांचे हित पाहूनच घेतले.
महाविकास आघाडी सरकारनेही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला, पण त्यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. शरद पवारांनी साताऱ्याच्या सभेत भर पावसात राज्यांतील जनतेला न्याय देण्यासाठी आम्हाला निवडून देण्याचे आवाहन केले तसे आश्वासन दिले. पण त्यांची आश्वासनेही त्याच पावसांत विरघळून गेली. महाविकास आघाडीच्या सरकारने किमान समान कार्यक्रम जाहीर केला. त्यात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेऊन त्यांनी जाहीरनामा तयार केला. पण या सरकारने भूमि अधिग्रहण कायदा करून शेतकऱ्यांचा मागच्या सरकरपेक्षाही मोठा अपेक्षाभंग केला.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सूचक म्हणून मी होतो पण त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयात घटक पक्षांना नाराज केले. मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले यावर या सरकारने तुटपुंजी मदत केली. शेतकऱ्यांना महापुरात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी स्वाभिमानीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. पण या सरकारने 150 रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली. जे सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही त्या सरकारला आम्ही पाठिंबा का व कशासाठी द्यायचा असा सवाल शेट्टींनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी शेट्टी पुढे म्हणाले, आम्ही भाजपच्याही मागे लागलो नव्हतो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला सोबत येण्याची विनंती केली होती. तर 2019 ला महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी आम्हाला शरद पवारांनी विनंती केली होती. यामुळे आम्ही दलबदलू ठरत नाही. या दोघांनाही आम्हाला फसवलं आहे.. आज आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत. त्यांचे आमचे सगळे सबंध संपले आहेत. हे मी आज राज्य कार्यकारिणी समोर जाहीर करतो आणि हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
यूपीए सरकारच्या काळातही आम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून घोटाळे बाहेर काढले. त्यावेळी जनतेला भ्रष्टाचार मुक्त सरकार पाहिजे होते. इंधनाचे दर भरमसाठ वाढत होते, यावर कुठेतरी निर्बंध लावणारे सरकार जनतेला पाहिजे होते. यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आमची चर्चा झाली .त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सकारात्मकता दाखवल्याने आम्ही यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. या देशातील शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही तो अहवाल दिला पण केंद्राने त्याला प्रतिसाद दिला नाही. 2022 साली मोदींनी उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगितले होते. आपण आमचा खर्च दुप्पट झाला.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले,जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कधीही लागू होतील. सरकार ओबीसी च्या माध्यमातून राजकारण करत सर्वसामान्य जनतेला उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी मधील घटक जनरल मध्ये कधीही निवडून येऊ नयेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार डाव खेळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने यावर लवकर तोडगा काढावा अन्यथा त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.
यावेळी रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोपळे, जालंदर पाटील, सावकार मादनाईक, संदिप जगताप, अमर कदम, वैभव कांबळे, पूजाताई मोरे, जयकुमार कोले. आदिसंह विविध जिल्यांचे जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट..
हुंकार यात्रा....
राज्य व केंद्र शासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांवर जाग आणण्यांसाठी व शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्यासाठी शेतकऱ्यांच्या हुंकार त्यांच्या कानापर्यत पोहचावा यासाठी पंधरा दिवसांत स्वतः राज्यभर हुंकार यात्रा काढणार असल्याचे शेट्टी यांनी जाहिर केले.
चौकट..
तासांत दहा लाख..
मा.खासदार राजू शेट्टी यांना संघटनेच्या वतीने नाविन चारचाकी गाडी देण्यासाठी निधिचे आवाहन यावेळी संघटनेच्या काही कार्यकर्यांनी यावेळी केली. त्याला भरभरून प्रतिसाद अवघ्या तासाभरात साडेदहा लाखाचा निधी जमा झाला.
फोटो..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना मा. खा. राजू शेट्टी. सोबत. व्यासपीठांवर रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोपळे, जालंदर पाटील, पूजाताई मोरे आदि मान्यवर.
छाया.