हेरले / प्रतिनिधी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदूर्ग रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी यांची संजय घोडावत विद्यापिठ अतिग्रे (ता.हातकणंगले) येथे जिल्हा गुणवत्ता कक्ष बैठक संपन्न झाली.
स्वागत प्राचार्य विराट गिरी यांनी केले.
प्रास्ताविक शिक्षण सहायक संचालक सुभाष चौगुले यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती देवीची प्रतिमा पूजन करून झाली.
या बैठकीमध्ये संचमान्यता आणि मान्यता संदर्भातील अडचणींचा मागोवा, पाच जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची संवाद बैठक व जिल्हा गुणवत्ता बैठक आदी तीन विषयांचे प्रशिक्षण संपन्न झाले.या बैठकीमध्ये सात शिक्षणाधिकारी , पस्तीस गटशिक्षणाधिकारी / उपशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी , पंचवीस विस्तार अधिकारी, चौदा जि. प. मुख्यालयातील कर्मचारी, एकशे अठ्ठावन केंद्रप्रमुख / केंद्र समन्वयक असे एकूण २३९ जण सहभागी झाले होते.
निपुण भारत अंमलबजावणी व यशोगाथा सादरीकरण या विषयावर व्याख्यानात डायट प्राचार्य डॉ. आय.सी. शेख म्हणाले दोन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण झाली आहेत. तिसरे सद्या मानले जात आहे. जागतिक चौथी औदयोगिक क्रांती आधुनिक तंत्रज्ञानावर आहे. त्यामुळे तिसऱ्या राष्ट्रीय धोरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे.
के कस्तुरीरंगन मसुदा समितीमध्ये ३ ते ९ शैक्षणिक वयोगटाचा विकास होणे महत्त्वाचे मानले आहे. कारण या वयातच ८५ टक्के मेंदू वाढीचा विकास होतो. म्हणून या वयातच मुलांच्यावर संस्कार झाले पाहिजेत.
पूर्व प्राथमिक व प्राथमिक अवस्थेमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान देऊन बालशिक्षणा कडून उच्च शिक्षणाकडे शिक्षण गंगा वाहिली पाहिजे. या देशातील सर्व मुलांना २०२६ पर्यंत 'घोका आणि ओका' या घोकमपट्टी पासून बाहेर काढायचे आहे. के कस्तुरीरंगन यांच्या २२ चॅप्टरमध्ये विदयार्थ्यांच्या सर्वागिंण शिक्षणाचा विचार केला आहे.
. गुणवत्तेचा भविष्यवेध या विषयावर सचिन देसाई यांनी व्याख्यान दिले. गुणवत्तेचा भविष्यवेध या विषयाच्या व्याख्यानात माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर म्हणाले, कोरोनाच्या काळात दोन वर्षे मुले मुलभूत क्षमतामध्ये मागे राहिली आहेत. केंद्रप्रमुखांना परिसरातील सर्व शाळांची इतभूंत माहिती असते. नियोजनामुळे वेळ, पैसा, श्रम वाचतो. शैक्षणिक उपक्रमांचे सुयोग्य नियोजन करावे. सर्वच शिक्षकांनी मुलांच्या गुणवत्ता विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे.
पहिल्या सत्रातील अध्यापन पूर्व नियोजन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस केले पाहिजे. दुसऱ्या सत्रातील दिवाळी च्या सुट्टीत केले पाहिजे. मुल्यमापनाचे नियोजनही त्या बरोबर केले पाहिजे.
सर्व शाळांमध्ये सहशालेय व शालेय उपक्रमांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर शाळा सिद्धी, अध्ययन स्तर निश्चितीमध्ये अक्षरस्तर निवड समजपूर्वक वाचन १ ते ४ व ५ ते ८ या वर्गांसाठी, शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा, शासकिय योजनामध्ये मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, सारथी शिष्यवृत्ती, स्वच्छ शाळा पुरस्कार, बेगम हजरत महल शिष्यवृत्ती, राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुगृह योजना आदीं योजना विद्यार्थी लाभार्थी पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांची आहे.
कोल्हापूर जिल्हा गुणवत्तेमध्ये पहिला आणायचा असल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
, शैक्षणिक प्रशासन गतिमान प्रशासन या विषयाचे व्याख्यान शिक्षण उपसंचालक महेश चोथे आदींनी व्याख्याने दिली.
शिक्षण उपसंचालक महेश चोथे म्हणाले,दुसरी आई निर्माण करायची नाही म्हणून परमेश्वराने शिक्षकाची निर्मिती केली आहे. दोन वर्षामध्ये कोरोनाच्या आपत्तीमुळे शैक्षणिक प्रणाली थांबली असल्याने थांबलेला काळ धावता करायचा आहे. अध्यापन करायचे व आपल्यातील गुरुजी जागा ठेवण्यासाठी आपल्याला उन्हाळी सुट्टीपूर्वी विद्यार्थ्यांच्या बौध्दीक विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रमाचे नियोजन करायचे आहे. आगामी शैक्षणिक वर्षात शाळा तपासणी परिपाठापासून सुरु करावी. सोमवार १ ऑगस्ट २०२२ पासून या मोहिमेची सुरुवात होईल. प्रथमता काही केल्या जराही बदल होत नाही त्या शाळांना भेटी देण्यासाठी निवड करायची आणि दुसरीचा वर्ग व चौथीचा वर्ग या दोन्ही वर्गांची तपासणी करावयची आहे.
स्वच्छ शाळा पुरस्कार ऑनलाईन नोंदणी, शाळा सिध्दी नोंदणी, स्वयंम मुल्यमापन माहिती १० एप्रिल २०२२ पर्यंत भरून वेळेत पूर्ण करावी. केंद्रप्रमुख - विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी - शिक्षणाधिकारी या स्तरातून अहवाल शेवटी शिक्षण उपसंचालकांना प्राप्त होईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती साठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया.
शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर म्हणाले, दोन वर्षाच्या कोराना काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन गुणवत्तेत मागे पडले आहेत. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी जिल्हा गुणवत्ता बैठक घेतली आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. पाच जिल्हयांमध्ये हे प्रशिक्षण कार्य सुरु ठेवावे त्यासाठी आपले सदैव सहकार्य राहिल.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे घडते ते महाराष्ट्रभर घडते. त्यामुळे या गुणवत्ता वाढीच्या प्रशिक्षणाचे लोण महाराष्ट्रभर होईल. प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी त्याचा लाभ विद्यार्थ्यांना द्यावा. कोल्हापूर शहरातील जरगनगर मधील पहिली ते सातवीच्या मराठी शाळेमध्ये बावीसशे विद्यार्थी संख्या फक्त त्यांच्या गुणवत्ते मुळेच आहे. या शाळेचा आदर्श सर्वांनी घेऊन आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे.
संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी समजून घेतली तर कोणतेही कार्य यशस्वी होते. टूजी,थ्रीजी, फोरजीची जशी गरज आहे तसेच उत्कृष्ट गुरुजींची शिक्षण क्षेत्रात गरज आहे. शिक्षक हा आपल्या जीवनातला मोठा भाग असतो. आई वडिलांनंतर शिक्षक महत्त्वाचे असतात. कोणाला कमी न लेखता ज्ञान घेण्यासाठी प्रत्येकाने तत्पर राहिले पाहिजे. शिक्षण क्षेत्राला सहकार्य व मदतीसाठी संजय घोडावत विद्यापीठ सदैव तत्पर आहे.
शिक्षण सहायक संचालक सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर,डायएटचे प्राचार्य डॉ.आय. सी. शेख, माध्यामिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर (सातारा ) माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत ( रत्नागिरी) प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड (सांगली), माध्यमिक शिक्षणाधिकार मुस्ताक शेख (सिंधुदूर्ग), उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, गटाशिक्षणाधिकारी शंकर यादव (करवीर),डॉ जी. बी. कळमकर ( कागल ), बी. एम.कासार ( राधानगरी), दीपक मेंगाणे ( भुदरगड), एस. एम. मानकर ( पन्हाळा), नंदकुमार शेळके ( शाहूवाडी ) प्रविण फाटक ( हातकणंगले) दीपक कामत ( शिरोळ) सुभेदार (चंदगड ) प्रभारी उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री जाधव, जे. टी. पाटील, सुधाकर निर्मळे
नितीन खाडे, गौरव बोडेकर, अजय पाटील आदी अधिकाऱ्यासह पाच जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राचार्य सागर माने यांनी केले. आभार गटशिक्षणाधिकारी डॉ. जी.बी. कळमकर यांनी मानले.
फोटो
संजय घोडावत विद्यापीठामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हा गुणवत्ता कक्ष बैठकीमध्ये मार्गदर्शन करतांना शिक्षण उपसंचालक महेश चोथे शेजारी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर विश्वस्त विनायक भोसले डायटचे प्राचार्य डॉ. आय.सी. शेख प्राचार्य विराट गिरी आदी मान्यवर.