गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
कोरोनामुळे आपल्या गावी परप्रांतीय परतले असून परप्रांतीय कामगार निघून गेल्यामुळे रिक्त झालेल्या जागी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये संधी देऊन युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी विनंती शिवसेनेच्या वतीने गोकुळ शिरगाव येथे झालेल्या बैठकीतून गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर असोसिएशन यांना देण्यात आले. दरम्यान शासनाकडे उपलब्ध माहितीनुसार ६० ते ६५ हजार परप्रांतीय आपापल्या राज्यात परत गेले असून त्यामुळे उद्योजकांना कामगार टंचाई जाणवू लागत आहे अशा वेळी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची सुवर्ण संधी असून रिक्त ठिकाणी स्थानिक युवकांना सामावून घेऊन जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करावी. अशी आग्रही मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी बैठकीमध्ये उपस्थित उद्योजकांना केली. सदरची बैठक गोकुळ शिरगाव येथे शिवसेना पदाधिकारी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. उद्योजकांच्या वतीने बोलताना गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी २० एप्रिल पासून उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी कामगारांना ने-आन करण्यासाठी वाहतूक व्यवस्थे मध्ये अनेक त्रुटी असल्याने कामगार कामावर येऊ शकत नव्हते त्यानंतर शासनाच्या पाठपुरावा करून कामगारावर दुचाकीवरून कामावर येण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर तीन मेपासून आतापर्यंत गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील पन्नास टक्क्यांहून अधिक कारखाने एक अथवा दोन शिफ्टमध्ये सुरू झाले . परंतु कामगारांचा तुटवडा असल्यामुळे उद्योग सुरू करणे अवघड बनले असून शिवसेनेच्या विनंतीचा मान ठेवून आम्ही या ठिकाणी स्थानिक युवकांना रोजगाराची प्राधान्य देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक उपायुक्त जमीर करीम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विलास सोनवणे यांनीही आपापल्या विभागातील रोजगार निर्मिती कार्यक्रमाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद खोत, शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव व शिवसेना तालुकाप्रमुख विराज पाटील गोशिमा सदस्य सुरजित सिंग पवार, अजित आजरी, नितीनचन्द्र दलवाई, राहुल तोडकर ,यशवंत हुंबे ,गोशिमा सचिव के टी सावंत आदी उपस्थित होते.
चौकट
युवकांनी रोजगार मिळवण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.mahaswayam.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी केले.
फोटो ओळ
गोकुळ शिरगाव येथे उद्योजक शासकीय अधिकारी व शिवसेना यांच्या मध्ये झालेल्या बैठकीत परप्रांतीय कामगार परतल्याने रिक्त झालेल्या जागेवर भूमिपुत्रांना रोजगार देण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला.