कोल्हापूर - प्रतिनिधी
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि त्या अनुषंगाने शाळा कधी सुरू होतील हे नेमके आजच्या घडीला तरी कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
याला उत्तर म्हणून बर्याच शाळा व क्लासेस यांनी मुलांना घरीच राहून व्हिडीओ कॉलिंगद्वारे तसेच झूम-मीटिंग अशा साधनांचा वापर करून तात्पुरते अॉनलाईन शिक्षण देणे आजपासून सुरू केले आहे.
मात्र या अॉनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना पालकांच्या खिशाला मात्र चांगलीच चाट बसत आहे. झूम-मीटिंग सारखे अॅप डाऊनलोड करून घ्यावे म्हटले तर चांगल्या प्रतीचा फोर जी असणाऱ्या मोबाईल हॅण्डसेट ची आवश्यकता असते. बर्याच पालकांकडे जूने साधे मोबाइल आहेत तर काही जणांकडे फोर जी मोबाईल असले तरी ते स्वतःला वापरासाठी लागतात. त्यामुळे नवीन मोबाईल खरेदी करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. बाजारात किमान सात ते दहा हजाराशिवाय चांगला मोबाईल येत नाही.
तर अॉनलाईन शिक्षणासाठी दिवसागणिक इंटरनेटचा वापर वाढला आहे त्यामुळे पालकांना रोज दोन जीबी डेटा मिळणारे किमान महिना दोन तीनशे रुपये रिचार्ज करावे लागते. कोरोना मुळे आर्थिकदृष्टय़ा आधीच मेटाकुटीला आलेल्या पालकांना ही अॉनलाईन शिक्षण पद्धत म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.
शिक्षण ही एकांगी चालणारी प्रकिया नाही..शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील तो नैसर्गिक व मुक्त संवाद असतो.तो संवादच विद्यार्थ्यांला ज्ञानाची कवाडे खुली करत असतो .इतका तो सहज आणि सुलभ होतो म्हणून ही सर्वाथाने ही महत्त्वाची आहे.
अॉनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांला शिक्षण देता येईल पण संस्कार देता येणार नाहीत. त्यांच्यात खरोखरीच संवाद होईल का प्रश्नच आहे.
जिवंत माणसांच्या संवादातून होते तेच खरे शिक्षण .म्हणून शाळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.पण कोरोनामुळे जरी आज अॉनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागला तरी पालक मात्र अडचणीत सापडले आहेत.
एवढं करुनही विद्यार्थी अशा शिक्षणामुळे खरोखरीच अभ्यास करुन पारंगत होणार का इंटरनेटचा मनोरंजनासाठी दुरुपयोग करून पालकांच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरवणार अशा शंका पालकांकडून व्यक्त होत आहेत.