प्रतिनिधी - वैभव करवंदकर -------
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन २२ वर्ष झाले. आज दि.१ जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्याचा २२ वा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या नकाशावर नंदुरबार जिल्ह्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले असले तरी त्याही पूर्वीपासून या शहराचा ऐतिहासिक ठेवा विविध माध्यमांतून सर्वांनी जपून ठेवला. त्यामुळे नंदनगरीचे नांव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले.
नंदगवळी राजापासून या शहराचा व परिसराचा परिचय इतिहासात सापडत असला तरी आजच्या काळापर्यंत शहरांच्या इतिहासावर आपल्या कार्यकर्तत्वाने आगळा-वेगळा ठसा उमटविणारे अनेक माणसे होऊन गेलीत त्यापैकीच या शहरात स्वतंत्र छायाचित्र व्यवसाय करुन या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. हा मान रामभाऊ जगन पाटील यांनाच जातो. फोटोग्राफिचा क्षेत्राकडे त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून पाहिले नाही. तर जीवनाच्या प्रत्येक क्षणाला कॅमेरात कैद करण्याचे सामर्थ्य आपल्याकडे आहे, आणि कॅमेऱ्यातून टिपल्या जाणाऱ्या प्रत्येक क्षणाला कलात्मकतेच्या उच्चपातळीवर न्यायचे आहे असे म्हणून त्यांनी केले याची साक्ष नंदुरबार जिल्ह्यात आजही दिसून येते. आजच्या युवा पिढीला याची जाण नसेल पण तिसऱ्या पिढीतील फोटो त्यांच्या घरात असतील त्यापैकी काही फोटो तर रामभाऊ पाटील यांनी निश्चित काढली असतील. पाटील फोटो हा केवळ त्य काळात स्टुडिओ म्हणुन परिचित नव्हता तर छायाचित्र क्षेत्रातील एक परवलीचा शब्द झाला होता. रामभाऊ पाटील याना दादा या नावाने घरातील मंडळी हाक मारीत. मात्र त्याच्या ब्रिटीश क्षेत्रातील दराराही तेवढाच होता. ते खरोखरच या क्षेत्रातील दादा होते. ब्रिटीश काळात १९३२ साली त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. केवळ पैसा कमविणे हे उद्दिष्ट नसलेल्या कलंदर जीवन जगलेल्या दादांनी या क्षेत्रात केवळ आपला ठसा उमटविला असे नाही तर शुन्यातून विश्व निर्माण करुन आपली स्वतंत्र कारकिर्द निर्माण केली.
आजच्या आत्याधुनिक युगात कल्पना करता येणार नाही अशा साधनांच्या कमतरतेतही त्यांनी फोटोग्राफीचे काही नजारे पेश केले आहेत की, ते फोटो पाहतांना आजही वाह क्या बात है असे सहजोदार निघाल्याशिवाय राहत नाही. आणि येथेच दादांच्या कलात्मकतेला दाद मिळते. त्या फोटोला खास दादा टच होता. त्यांच्या छायाचित्रणांच्या वाटचालीतील एक महत्वाची आठवण देण्याचा मोह टाळता येत नाही. आदिवासी समाजात अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठित स्थान गुलाम महाराज यांनी मिळवले.
गुलाम महाराज यांनी आदिवासी समाजात जागृतीचे अत्यंत मौलिक कार्य केल्याने त्यांच्या स्मृतिदिन आजही तळोदा तालुक्यातील खरवड भागात साजरा केला जातो. दादांनी त्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात बंदीस्त करुन ठेवली. छायाचित्र काढणेही ही केवळ उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी असतांना दादांनी गुलाम महाराजांचा तो पहिला आणि कदाचित शेवटचा फोटो या फोटोची प्रत आजही नितीन पाटील यांच्याकडे उपलब्ध आहे. अनेक आदिवासी बांधव गुलाम महाराजांचा फोटो मागायला येतात. गुलाम महारांच्या स्मृतिदिन जो फोटो पूजला जातो तोही दादांनी काढला आहे.
ही हृदय आठवण दादांचा नातू व वृत्तपत्र छायाचित्रकार नितीन पाटील अभिमानाने सांगतो. ऐकणाराही क्षणात नतमस्तक होतो. छायाचित्रणाप्रमाणेच दादांनी प्रचंद समाधान मिळवून दिले. तरीही स्वछंदी, कप्पेबंद आयुष्य जगणे मानवणारे नव्हते. त्यांना शिकारीचा भारी नाद होता. त्यासाठी त्यांनी ब्रिटीशांकडून बंदुकीचा परवानाही मिळविला होता. शिकारीसाठी दादांनी अवघा सातपुडा पालथा घातला होता. शस्त्र आल्यानंतर दादांनी शस्त्र विक्रीचाही परवाना काढून त्या व्यावसायातही पदार्पण केले. म्हणजे पारंपारिक चाकोरी बद्ध आयुष्य जगत असतांना सामाजिक कार्याची आवड दादांना स्वस्थ बसू देत नव्हती. सामाजिक कार्यकरित असतांना त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढविली त्यात त्यांना भरघोस यश मिळून ते नगरसेवक झाले.
त्या काळात त्यांनी विकासकार्यासाठी अविरत प्रयत्न केले. दादांच्या नगरसेवकपदाच्या काळात पालिकेच्या इमारतींचे उद्घाटन तत्कालिन मुख्यमंत्री ना.यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. विविध क्षेत्रात दादांनी यशस्वी संचार करुन आपले कर्तृत्व सिध्द केले. सामाजिक क्षेत्राबरोबर त्यांनी कौंटुबिक जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली. आपल्या लहान भावाचे शिक्षण पूर्ण करुन सिव्हिल इंजिनिअर बनविले. त्यांचे बंधू स्व.वामन पाटील दिल्लीत स्थायिक होते
. शिकारीचा छंद असलेल्या दादांनी गॅसवर चालणारी ट्रक आणुक शहरवासियांना चकीत करुन सोडले.
अशा विविध प्रकारे नावाजलेले कर्तृत्वान व्यक्तिमत्व कै.रामभाऊ जगन पाटील यांचे दि.१ जुलै १९९९ रोजी निधन झाले. आज त्यांचा २१ वा स्मृतिदिन दादांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न...
संकलन - अविनाश पाटील, नंदुरबार