· कोरोना संसर्ग
खरीप हंगाम विषयक बाबींचा आढावा
·गरोदर महिला, वयोवृद्ध यांची विशेष काळजी घ्या
स्थलांतरित नागरिकांची आरोग्य तपासणी आवश्यक
आरिफ पोपटे वाशिम, दि. १८ () :
कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध घेण्यासाठी रेड झोनमधून जिल्ह्यात परतलेले सर्व नागरिक, जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रासह इतर भागातील नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. कोरोना विषाणू संसर्ग रोखाण्यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १८ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्गापासून अधिक हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करा. तसेच त्यांना शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ज्यांची प्रसूती जवळ आलेली आहे, अशा गरोदर महिलांची कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने तपासणी करावी. विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रातील गरोदर महिला, अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची तपासणी प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटर, जिल्हा कोविड रुग्णालयातील उपलब्ध सोयी-सुविधा, औषधे व साहित्यांची उपलब्धता, मनुष्यबळ तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे विविध योजनांतर्गत करण्यात येत असलेल्या अन्नधान्य वितरणाचा श्री. सिंह यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच संचारबंदी काळात पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचीही माहिती घेतली.
जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना याविषयी माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात येत असलेल्या उपाययोजना, आरोग्य तपासणी याविषयी माहिती दिली.
*खरीप हंगामातील सद्यस्थितीचा आढावा*
खरीप हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत झालेली पेरणी, पीक कर्ज वाटप, बियाणे व खतांची उपलब्धता आदी बाबींचा आढावाही विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी घेतला. यावेळी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात आतापर्यंत ५३ टक्के पेरणी झाली असून बियाणे व खते यांचा पुरेसा पुरवठा झाला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. तोटावार सांगितले. तसेच खरीप हंगामामध्ये बीज प्रक्रिया, उगवण क्षमता तपासणीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.