कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विशेष मोहीम
अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती घेणार
आरिफ़ पोपटे वाशिम, दि. २० :
कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील शहरी भागात नगरपालिका व आरोग्य विभागाच्या पथकाकडून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. या पथकाला आपल्या आरोग्याविषयी तसेच अतिजोखमीच्या आजाराबद्दल अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचे लवकरात लवकर निदान होऊन योग्य उपचार झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. कोरोना विषाणू संसर्गाची ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे ही प्रमुख लक्षणे आहेत. तसेच शरीरातील ऑक्सिजन पातळीही कमी होते. अशी लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी होऊन लवकरात लवकर निदान व्हावे, योग्य उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभाग व नगरपालिका पथकामार्फत जिल्ह्यातील शहरी भागात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये थर्मल स्कॅनिंगद्वारे अंगातील ताप, तसेच पल्स ऑक्सीमीटरद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासली जात आहे. तरी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकाकडून कुटुंबातील सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी करून घ्यावी. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे अथवा त्रास असल्यास त्याची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.
कोरोना संसर्गाचे लवकर निदान होऊन रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी, तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या आरोग्य तापसणीद्वारे मिळणारी माहिती उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी व आरोग्य पथकाला अचूक माहिती देवून सहकार्य करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अतिजोखमीच्या आजाराची अचूक माहिती द्या
मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, क्षयरोग यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग अधिक घातक असल्याचे दिसून येते. अशा व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने त्यांची माहिती सुद्धा आरोग्य तपासणी दरम्यान घेतली जात आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबात असे आजार असलेल्या व्यक्तींची अचूक माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावी. तसेच ६० वर्षांवरील व्यक्ती, गरोदर महिला यांचीही माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.