हेरले / प्रतिनिधी
प्रशांत तोडकर
दि.8/8/20
हातकणंगले तालुक्यातील मौजे माले गावांमध्ये लोकनियुक्त सरपंच बंटी ऊर्फ प्रताप पाटील यांनी नऊ गणेश उत्सव तरूण मंडळाना एकत्रित करून 'एक गाव एक गणपतीचा' ऐतिहासिक निर्णय घेऊन ही संकल्पना सत्यात उतरविली. ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच बंटी ऊर्फ प्रताप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तरूण मंडळाची बैठक संपन्न झाली.
कोरोना महामारीमुळे सामुहिक संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे आपले गाव आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित राहावे या उद्देशाने लोकनियुक्त सरपंच बंटी ऊर्फ प्रताप पाटील यांनी माले गावातील गणेश उत्सव साजरा करणारी तरुण मंडळे अष्टविनायक तरूण मंडळ, सिध्देश्वर तरूण मंडळ, जय शिवराय तरूण मंडळ, संत गोरोबा काका तरूण मंडळ, बिरदेव तरूण मंडळ, रणझुंजार तरूण मंडळ, शिवसंघर्ष तरूण मंडळ ,आण्णा भाऊ साठे तरूण मंडळ, जय शिवराय तरूण मंडळ आदी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक गाव एक गणपतीची संकल्पना स्पष्ट केली.
सरपंचांच्या एक गाव एक गणपती या संकल्पनेस सर्व मंडळांनी एकमुखांनी पाठींबा दिला आणि गावात सर्व तरूण मंडळांनी एकत्रितरित्या गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरले. गणेश उत्सव काळात ग्रामपंचायतीमध्ये गणपती देवाची मुर्ती बसवून सात दिवस प्रत्येक मंडळाच्या पाच सदस्यांनी आरती करण्याचे ठरले.यावेळी माजी सरपंच अभयसिंह पाटील, माजी उपसरपंच सुनिल कांबळे ग्रामपंचायत सदस्य संतोष खोत पोलीस पाटील संदिप साजणकर राहूल कुंभार एल व्ही पाटील निलेश पाटील सौरभ पाटील प्रमोद पाटील रविंद्र स्वामी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
मौजे माले( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बंटी ऊर्फ प्रताप पाटील यांना एक गाव एक गणपती या निर्णयाचे पाठींबा पत्र देतांना नऊ तरूण मंडळांचे पदाधिकारी.