कोल्हापूर प्रतिनिधी
शहरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन ज्या त्या प्रभागांमध्ये करण्याचे नियोजन केले होते . कसबा बावडा येथे सहा ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आली होती. तर सार्वजनिक मंडळांनी सामाजिक उपक्रम म्हणून जवळपास दहा ठिकाणी अशी सजावट केलेली कृत्रिम विसर्जन कुंड सज्ज ठेवली होती.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी ज्या ठिकाणी गर्दी होते, त्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाला प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामुळे कसबा बावडा राजाराम बंधारा, पंचगंगा नदी, रंकाळा तलाव येथे विसर्जन करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. याला प्रतिसाद देऊन कसबा बावडा येथील बहुतांशी नागरिकांनी आपल्या जवळच्या कुंडात गणरायाचे विसर्जन केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क चे काटेकोरपणे पालन केले गेले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात विसर्जन करण्यात आले.
कोल्हापूर महापालिकेतर्फे प्रत्येक प्रभागात तात्पुरते विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. शहरात आणि उपनगरात जवळपास नव्वद ठिकाणी विसर्जन कुंड ठेवले होते . या ठिकाणी विसर्जन होणाऱ्या गणेशमूर्ती ट्रॅक्टरच्या साह्याने नेऊन महापालिकेचे कर्मचारी इराणी खण येथे त्यांचे विसर्जन केले गेले . यासाठी महापालिकेने ट्रॅक्टर ट्रॉली भाडेतत्त्वावर घेतले होते.