कोल्हापूर, दि. 15 ऑगस्ट 2020
सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो ही आशा व्यक्त करताना गणेश उत्सवात गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील शुभेच्छा संदेशात म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा आज देशभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन साजरा होत आहे. ज्यांच्या असिम त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, देशभक्तांच्या, क्रांतीकारकांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करतो. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.
कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यात कोरोना समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासन-प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहेच, मात्र आम्ही कोल्हापूरी- जगात भारी ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे अंमलात आणून आपण, आपलं कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जवळपास गेली पाच महिने लॉकडाऊनसह अन्य प्रतिबंधक उपायांव्दारे कोरोनाला हरविण्याचे प्रयत्न शासन आणि प्रशासन यांच्याकडून युध्दपातळीवर केले जात आहेत. असे असले तरी गेल्या महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात 12 हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुध्दच्या युध्दात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येकाने नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाला हरविण्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.
प्लाझ्मा थेरेपीने 25 अत्यवस्थांना जीवदान
कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पीटल या कोरोना हॉस्पीटलांबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पीटलांनीही रुग्णसेवेसाठी योगदान दिले आहे.
7 हजार 332 बेडची उपलब्धता
जिल्ह्याचे प्रमुख आरोग्य उपचार केंद्र म्हणून सी.पी.आर.कडे पाहिले जाते. सी.पी.आर. मध्ये सध्या 429 बेड्सची व्यवस्था असून त्यापैकी 222 ऑक्सिजन बेड्स आहेत. आणखी 94 ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचे काम सुरु आहे. आयसीयू बेड्स 73 असून आणखी
8 बेड्सची भर घातली जात आहे. त्याचबरोबर 66 व्हेंटिलेटर, 50 एनआयव्ही, 20 हाय फ्लो नेझल ऑक्सीजन या सुविधा उपलब्ध आहेत. सीपीआरसह समर्पित कोरोना हॉस्पीटल आणि समर्पित कोरोना मदत केंद्र यांना एकूण 12 एक्सरे मशिन देण्यात येत आहेत. जिल्ह्यात दररोज होणारी 2 हजार स्वॅब नमुने तपासणी क्षमता आता 5 हजार पर्यंत करण्यात येत आहे. प्रत्येक कोव्हिड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
कोव्हिड काळजी केंद्र, समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रांमध्ये एकूण 7 हजार 332 बेडची उपलब्धता असून यामध्ये 808 ऑक्सिजन बेड व 288 आयसीयू बेड आहेत.
रुग्णांना हॉस्पीटलमधील उपलब्ध बेडची माहिती कळावी तसेच बेड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी तीन स्वतंत्र मोबाईल क्रमांक दिले आहेत. दिवसाला सरासरी 400 ते 500 फोन स्वीकारण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पीटलमध्ये शासकीय दराने बील आकारणी व्हावी तसेच उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी प्रत्येक हॉस्पीटलसाठी एका शासकीय कर्मचाऱ्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. महापालिकेच्यावतीने खासगी रूग्णालयांना दरफलक लावण्याबाबत कळविण्यात आले असून बिले तपासणीसाठी लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हॉस्पीटलांसाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.
कोरोना योध्यांना मानाचा मुजरा
जिल्ह्यात सुरु असलेल्या कोरोना विरुध्दच्या लढ्यात शासन, प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था-संघटना तसेच जिल्ह्यातील जनतेने केलेले सहकार्य महत्वाचे आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस व सर्व स्टाफ, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागाचे शासकीय कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे सदस्य या सर्व कोरोना योध्दांना आजच्या स्वातंत्र्यदिनी मी मानाचा मुजरा करतो ! अशा शब्दात पालकमंत्र्यांनी गौरव केला.
कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेवून हा उपक्रम सुरु करुन तो यशस्वी केला आहे. याबाद्दल वडणगे ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य व कोरोना दक्षता समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ यांचे मी मनापासून कौतुक करतो. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अणेक ठिकाणी हा उपक्रम सुरु झाला असून यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण निश्चितपणे कमी झालेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आजअखेर जिह्यात 3 हजारहून अधिक कोरोना बाधित घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फत या सर्वांना किट दिले असून त्यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, डिझीटल थर्मामीटर, मास्क इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजारहून अधिक आता बरे झाले आहेत.
कोल्हापूरकरांचे दातृत्व
कोरोनाच्या या संकट काळात अनेक सेवाभावी संस्था, संघटना व व्यक्तींनी कोल्हापूर रिलीफ फंड याला मदत करुन दातृत्वाची परंपरा जपली आहे. रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर तर्फे 62 लाख रुपये खर्चून 538 बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी 120 बेड्स च्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल येथे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. या ठिकाणी क्रिडाई कोल्हापूर तर्फे पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच शिरोली येथील जैन मंदीरामध्ये जैन समाजातर्फे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. कसबा बावडा, राजोपाध्येनगर, फुलेवाडी या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कोवीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजक व औद्योगिक संघटना यांनी 20 व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले असून त्यापैकी 3 व्हेंटीलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत.
घाटगे ग्रुपने शववाहिका उपलब्ध करुन दिली आहे. व्हाईट आर्मी संस्थेने कोवीडच्या काळात लाखो गरजूंना जेवण उपलब्ध करुन दिले आहे. अनेक शैक्षणिक संस्था, साखर कारखाने यांनी सुध्दा आपल्या कडील सुविधा कोरोना केअर सेंटर तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. होर्डिंग ॲण्ड आऊट सोर्सींग ॲडर्व्हटायझर्स असोसिएशनच्या माध्यमातून 2 हजार प्रबोधनाचे फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक ज्ञात-अज्ञात लोकांनी सुध्दा या संकट काळात मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच सर्वांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले.
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज
जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूर प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने राबविल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतूनही जिल्ह्याला सावरता आले. यापुढे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे नियोजन सुध्दा केले आहे. याबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.
पूर परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफच्या 4 पथकांसह स्वयंसेवी संस्थांची पथकेही तैनात आहेत. यात जवळपास 808 स्वयंसेवक आहेत. 51 रबर बोट, 700 लाईफ जॅकेट, 400 लाईफ रींग, 18 आस्का लाईट उपलब्ध आहेत. पुढारी रिलिफ फौंडेशनतर्फे दोन यांत्रिकी बोटी महापालिकेला नुकत्याच प्रदान करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही पाच यांत्रिकी बोटी जिल्हा प्रशासनाला प्रदान करण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री म्हणाले.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यास सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी 330 कोटीची तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 130 कोटीचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष 2019-20 साठी 13 कोटी 17 लाख तर चालू वर्षी 13 कोटी 25 लाख तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्याचा माझा प्रयत्न राहील.
छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, म. फुले,
डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर शासनाची वाटचाल
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, म. जोतीराव फुले, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शासनाची वाटचाल सुरू आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 43 हजार 965 शेतकऱ्यांच्या खात्यावर 262 कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास शासन वचनबध्द आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेच्या कर्ज खात्याशी संलग्न करुन त्यांचे प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे. या योजनेमुळे प्रती शेतकरी दोन लाखांपर्यतची कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा करत आहे. राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्थाकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज "महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने" तून माफ केले जात आहे. तसेच जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात, अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मानस आहे.
दहा रुपयात शिवभोजन थाळी योजना आघाडी शासनाने सुरु केली आहे. शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जिल्ह्यातील हजारो गरजू लोकांना होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या गरजूंना पोटभर जेवण उपलब्ध करुन दिले आहे. जिल्ह्यात 34 ठिकाणी ही योजना सुरु असून आतापर्यंत 4 लाख 21 हजार 477 लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.
गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही कंट्रोल रुमचा वापर उपयुक्त असल्याने पाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून व जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 1 कोटी 9 लाख 15 हजार इतका निधी खर्च करुन सीसीटीव्ही कंट्रोल रुम पाचगांव येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून या तीन गावातील 63 ठिकाणी 147 कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सांगून पोलीस शौर्य पदक मिळालेल्या अधिकारी व जवान अशा 14 जणांचे त्यांनी अभिनंदन केले.
नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार गुणवंत विद्यार्थ्यांनी यश मिळवून कोल्हापूरचा नावलौकीक वाढविला आहे. नेर्ली गावच्या डॉ. प्रणोती संकपाळ, राजारामपुरी येथील गौरी पुजारी-किल्लेदार, जवाहरनगर येथील सौरभ व्हटकर आणि पन्हाळा तालुक्यातील किसरुळ येथील अजय कुंभार या गुणवंतांच्या हातून कोल्हापूरच्या परंपरेला साजेशी कामगिरी नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपल्या सर्वांना आनंद देणारा गणेशोत्सव पुढील आठवड्यात साजरा होणार आहे. आपण सर्वांनी उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा. पण सोशल डिस्टंसिंग तसेच स्वत:च्या आणि कुटूंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवात प्लाझमा दान सारखे उपक्रम राबवून कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी सहकार्य करावे. मोहरमच्या उत्सवात सुध्दा सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती तुम्हा आम्हा सर्वांनाच नितांत आदर आहे. जिल्हयातील शहीद जवानांच्या तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या प्रती सर्वांनीच उतराई होणे अगत्याचे आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती तुम्हा-आम्हा सर्वांना मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो, ही आशा व्यक्त करतानाच कोव्हिड -19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांना त्यांनी आदरांजली वाहिली.सायकलींगमध्ये डॉक्टरेट ऑफ ॲथलेटिक्स ही मानाची पदवी मिळाल्याबद्दल अथर्व गोंधळी याचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, संजय शिंदे, श्रावण क्षीरसागर, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस आदी उपस्थित होते.
अव्वल कारकून नलिनी मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.