सतेज ऋतु वृक्षारोपण व संवर्धन मोहीमेंतर्गत कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये रविवार दि.12 जुलै रोजी एकाच दिवशी 5 हजार झाडे लावणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पालकमंत्री ना. सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी झाडे लावून ती जगवीणे महत्वाचे आहे. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील विधानसभा निवडणुक लढविताना प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यामध्ये आमदार झाल्यावर मतदार संघात दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पाच वर्षात 25 हजार झाडे लावणार असल्याचे सांगीतले होते. त्यानूसार यावर्षीपासून सतेज ऋतु वक्षारोपण व संवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहीमेंतर्गत तज्ञांच्या सल्यानूसार जादा ऑक्सीजन देणारी तसेच रस्त्यांची शोभा वाढविणारी झाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये मोहगणी, सप्तपर्णी, गुलमोहर, फेलटोफोरम, कडुनिंब, वड, आंबा, सिताफळ आदी झाडांचा समावेश आहे. या झाडांची सरासरी उंची 6 फूट इतकी आहे. या झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी लोकांनी हे झाड दत्तक घेवून त्याची निगा राखावी अशा प्रकारचे नियोजन केले आहे. शनिवार दि.11 जुलै रोजी प्रत्येक गावचे सरपंच तसेच प्रभागाचे नगरसेवक यांचेकडे ही झाडे सुपुर्द केली जाणार आहेत. रविवारी एकाच दिवशी संपूर्ण दक्षिण मतदार संघात ही झाडे लावण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणाची ही मोहीम राबविताना सोशल डिस्टन्स पाळावे तसेच स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.