*नंदुरबार- ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर ) -----* नंदुरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे ऑन लाईन व्हॉईस ऑफ नंदुरबार या गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे ऑन लाईन उदघाटन उद्योगपती ऍड. मदनलाल जैन यांच्या हस्ते पार पडले.
व्हॉईस ऑफ नंदुरबार या स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष. यावर्षी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता स्पर्धेत खंड न पडू देता घरीच रहा, सुरक्षित रहा या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ नंदनगरीने सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली होती. या स्पर्धेचे उद्घाटन देखील संगणकाची कळ दाबून ऍड.मदनलाल जैन यांनी केले. यावेळी रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, प्रितिष बांगड, ट्रेझरर जितेंद्र सोनार, शब्बीर मेमन, प्रोजेक्ट चेअरमन हर्षल पाटील आदी उपस्थित होते. व्हॉईस ऑफ नंदुरबार स्पर्धेच्या पहिली फेरीसाठी एकुण ५८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ही फेसबुकद्वारे लाईव्ह करण्यात आली. या ऑनलाईन स्पर्धेला स्पर्धक व त्यांच्यासोबतच रसिक श्रोत्यांनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला. या प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून चंद्रशेखर चव्हाण व मिनल म्हसावदकर यांनी काम पाहिले. ५८ पैकी ४६ स्पर्धकांची दुसर्या फेरीसाठी निवड करण्यात आली असून सदर सेमिफायनल फेरी दि.१२ जुलै रोजी तर अंतिम फेरी १६ जुलै रोजी ऑनलाइन झूम या ऍपद्वारे घेण्यात येईल. सदर उद्धघाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले. स्पर्धेच्या नियोजनासाठी प्रोजेक्ट चेअरमन हर्षल पाटील, आकाश जैन, विवेक जैन, मुर्तुझा वोरा, अब्बास काटावाला तसेच क्लबचे सदस्य परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी पंधरा हजार, दहा हजार व सात हजार रोख या स्वरुपात आकर्षक भेटवस्तू स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा पारदर्शक व उच्च दर्जाची व्हावी, या उद्देशाने स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील संंगित क्षेत्रातील तज्ञ व नामवंत गायक परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.