• केवळ अत्यावश्यक कारणासाठीच जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी
• अवैध मार्गाने जिल्ह्यात प्रवेश केल्यास गुन्हे दाखल होणार
रजनिकांत वानखेडे वाशिम प्रतिनिधी
वाशिम, दि. १४ :
कोरोना विषाणू संसर्गाला विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत असून आज, १५ जुलैपासून जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विनापरवानगी जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक कारणासाठीच जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. विनापरवानगी जिल्ह्यात प्रवेश केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगरूळपीर व रिसोड शहरात पूर्णतः लॉकडाऊन करण्याचे, तसेच मालेगाव, वाशिम, कारंजा लाड व मानोरा शहरातील दुकानांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी १३ जुलै रोजी निर्गमित केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून आता जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसेच जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून, रीतसर पूर्वपरवानगी न घेता जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत.
केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक कारणासाठीच जिल्ह्याबाहेर जाता येईल. मात्र, त्यासाठी covid19.mhpolice.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून ई-पास प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी सुद्धा ई-पास बंधनकारक आहे. जिल्यास तील सर्व प्रमुख मार्गांवर चेकपोस्टवर ई-पासची तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले.
*सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड*
सार्वजनिक ठिकाणी, शहरात, गावात फिरताना चेहऱ्यावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टा न बांधणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी यापूर्वीच निर्गमित केले होते. या आदेशाची सुद्धा १५ जुलैपासून अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. चेहऱ्यावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टा न बांधणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडून ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. या बाबींचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असून दंडाची रक्कमही वसूल केली जाईल.
*शहरी भागात दुध संकलनास सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा*
मंगरूळपीर व रिसोड शहरात १५ ते २१ जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात सर्व दवाखाने (पशुवैद्यकीयसह), मेडिकल २४ तास सुरु थावण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच भाजीपाला विक्री, दुध संकलन व विक्री, पिठाची गिरणी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे. तसेच सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पिण्याचे पाणी व घरगुती गॅस घरपोच देण्यास मुभा राहणार आहे. तर मालेगाव, वाशिम, कारंजा लाड व मानोरा या शहरांमध्ये १५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, बँक सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. केवळ दवाखाने (पशुवैद्यकीयसह), मेडिकल २४ तास सुरु थावण्यास मुभा देण्यात आली आहे. वरील सहाही शहरांमध्ये केवळ दुध संकलनास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. मात्र, या काळात दुध विक्री करण्यास मनाई राहील.