साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की,
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता.वाळवा) येथील साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहिर म्हणून परिचित असले तरी त्यांनी मराठी साहित्यातील लोकवाड:मय, कथा,नाट्य,लोकनाट्य,कादंबऱ्या,चित्रपट,पोवाडे, लावण्या,वग,गवळण,प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले आहेत.तसेच तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी त्यांनी लोकांच्या मधून मोठी जनजागृती केली आहे.त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्येही त्यांनी शाहिरीतून मोलाचे योगदान दिले आहे.
छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवाडय़ाच्या माध्यमातून रशियापर्यंत पोचवीले.पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा सन्मान देखील केला.१ ऑगस्ट २०२० हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. साहित्य क्षेत्रातील नाव व त्यांचे कार्य पाहता त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शिफारस होणे आवश्यक आहे.त्याकरिता विधानसभा व विधान परिषद या सभागृहात ठराव होणे महत्त्वाचे असते.मात्र, कोरोना पार्श्वभूमीमुळे ते शक्य नाही म्हणून राज्य शासनाने हा प्रस्ताव त्वरित तयार करुन केंद्र शासनाला पाठवावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे हि लेखी निवेदनाद्वारे अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती देवुन पुरस्काराने सन्मानित करण्याची विनंती केली आहे.