* *नंदुरबार - ( प्रतिनिधी - वैभव करवंदकर ) --------*
नंदुरबार शहर व तालुक्यातील दुग्ध व्यावसायिकांना कडक संचारबंदी काळात रविवारी सायंकाळी काही वेळ घरोघरी जाऊन दूध वाटपासाठी शिथिलता देण्यात यावी. ह्या मागणीचे निवेदन वावद येथील दूध व्यावसायिक तथा महाराष्ट्र वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाळ भटू लगडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ईमेल द्वारे पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दर रविवारी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत कडक संचारबंदी जारी केली आहे. अत्यंत स्वागतार्ह आणि महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नंदुरबार शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नंदुरबार शहर आणि तालुक्यातील दुग्ध व्यावसायिकांना दर रविवारी संचारबंदी काळात सकाळी ९ वाजेपर्यंत सुट देण्यात आली आहे. त्याप्रमाणे सायंकाळी ५ ते ७ यावेळेस शहरातील विविध भागात घरोघरी जाऊन दूध वाटपासाठी शिथिलता देण्यात यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, दूध जीवनावश्यक पदार्थ असून नाशवंत देखील आहे. कारण सायंकाळी संकलित केलेले दूध वाटप न झाल्यास दूध विक्रेत्यांचे नुकसान होणार आहे. याशिवाय शहरातील नागरिकांची देखील दुधाविना गैरसोय होईल. म्हणून कडक संचारबंदीच्या काळात दुध विक्रेत्यांना सांयकाळी सवलत देण्यात यावी. याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्यासाठी दुध विक्रेते बांधिल आहेत. सामाजिक अंतर कायम ठेवून मास्क लावून आणि नियमितपणे सॅनिटॉईझरचा वापर करीत दुध वितरण करण्यात येईल. म्हणून कडक संचारबंदी काळात किमान सायंकाळी ५ ते ७ यावेळेत दुध विक्रेत्यांना मुभा देण्यात यावी अशी मागणी नंदुरबार शहर आणि तालुक्यातील विविध दुध विक्रेत्यांतर्फे महाराष्ट्र वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष आणि वावद निवासी गोपाल भटू लगडे तसेच गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. सदर निवेदन नियमांच्या अधीन राहून जिल्हाधिकारी कार्यालयात ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे.