'. माजगाव प्रतिनिधी-
कोरोनाच्या संकटकाळात शैक्षणिक व्यासपीठ शाहुवाडी यांच्या कार्याचा गौरव संपत गायकवाड मा. सहा.शिक्षण संचालक यांनी केला आहे. तो त्यांच्याच शब्दांत वाचा.
शैक्षणिक व्यासपीठ शाहुवाडी जिल्हा कोल्हापूरने साथी शिक्षकांच्या व संवेदनशील लोकांच्या मदतीने करोना महामारीच्या संकटात केलेले मदतकार्य माणुसकीच्या पलिकडचे आहे. तसेच तुम्ही सर्व शिक्षक बंधू ५,००० मुलांना मोबाईलवरून रोज मार्गदर्शन करता नक्कीच वेडे असणार ! नाहीतर असले धाडस जीवाच्या आकांताने कोण करेल? तुमच्या सेवाभावी कार्यासाठी तुमच्या समोर नतमस्तक.
शाहुवाडी तालुक्यात सुमारे शंभरभर शिक्षक एकत्र येऊन पदरमोड करतात, मुलांना मदत करतात, शिक्षकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देत आहात, समाजातील गुणवंतांचा सन्मान करता आहात व गरजूंना मदत करता आहात एवढचं ऐकलं होतं, प्रत्यक्ष पाहिलं होतं, पण करोना महामारीच्या काळात लॉकडाऊन असतानाही तुम्ही सर्व वेडे लोक मदत व शैक्षणिक बाबींसाठी कार्यरत होतात हे पाहून अचंबीत झालो.
शाळा सुरू करणे, Online शिक्षण देणे ,विद्यार्थी मार्गदर्शन करणे हे आपण न सांगता करत आहात. तालुक्यातील मोबाईल शाळांना रोज मोबाईलवरून मार्गदर्शन करत आहात. कोणी मार्गदर्शन करायचे याचे वेळापत्रकही केले आहे. विद्यार्थी मदत केंद्र तयार केले असून रोज ५,००० मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन आपण करत आहात. शैक्षणिक व्यासपीठाचे सर्व सदस्य सामाजिक भान ठेऊन करोना नियंत्रणासाठीच्या ड्युटीवर आहेत. शाळेत क्वारंटाईन केलेल्या लोकांना मार्गदर्शक करण्यासाठी शाळेबाहेर थांबणे, चेकपोष्टवर ड्युटी करणे ( रत्नागिरी येथून कोल्हापूर जिल्ह्यात येणारे लोक), मा तहसिलदार सांगतील ती कामे करणे.
ही सर्व कामे सांभाळत समाजातील संवेदनशील लोकांकडून मदत जमा करून पुढील गोष्टी आपण चाकोरीबाहेर जाऊन केल्या आहेत,करत आहात.
तालुक्यातील लमाण तांडे व ऊसतोड कामगार यांच्या ७९० लोकांना सुमारे ५०,००० रूपयांच्या धान्याचे कीट आपण पुरविले. काम बंद असल्याने मुलांबाळांची उपासमार पाहून आपली अंत: करणे गहिवरली त्यातून आपण ही मदत केली. किमान महिनाभर पुरेल एवढे धान्य दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान सर्वकाही सांगून गेले. तुमच्यात त्यांनी परमेश्वर पाहिला.
तालुक्यातील वाडी- वस्तीवर राहणारे गरीब व होतकरू १२ वीच्या विद्यार्थांना पुस्तकेही मिळत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन आपण १७५ मुलांना पाठ्यपुस्तके खरेदी करून दिलीत. मुलांचा त्यामुळे घरी अभ्यास सुरू झाला.
अंगणवाडी सेविका व आशा वर्कर स्वत:चा जीव धोक्यात घालून करोना लढ्यात कार्यरत आहेत. या भगिनींना १,००० रूपये प्रमाणे ३५,००० रूपये आपण वाटलेत. किमान १० दिवसांचा किराणा माल त्यांना घरी भरता आला. महाराष्ट्रात शिक्षकांचे वतीने अशी मदत केल्याचे कुठे दिसून आले नाही. या मदतीसाठी तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा.
करोना विरोधात दिवसरात्र कार्यरत असणारे तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांचा तुम्ही सन्मान केलात. त्यांना प्रशस्तिपत्र दिले.
करोना संसर्गा विरोधात काम करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन तुम्ही सन्मान केलात. सफाईकामगार, नर्सेस, पोलीस कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, मुख्याद्यापक व शिक्षक यांचा यामध्ये समावेश होता .
नाम फौंडेशन चे वतीने आपल्या विश्वासावर पाठविलेले व मा इंद्रजीत देशमुखसर( माजी अति.मुकाअ) यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित,निराधार व फिरस्ते यांना ७०० धान्य कीटचे वाटप आपण केले.
शैक्षणिक व्यासपीठच्या अध्यक्षांनी त्यांना मिळालेली आदर्श शिक्षक राज्य पुरस्काराची रूपये १,००,००० या रक्कमेत स्वत:चे रूपये १०,००० घालून पुरग्रस्ताला दिली होती. सुमारे सात लाखाचा निधी जमा करून तुम्ही त्याच्या व्याजातून विविध उपक्रम राबविता. पूरग्रस्त भागातील शाळांना तुम्ही वॉटर प्युरिफायर देता. स्पर्धा परीक्षेची तयारी पहिलीपासून व्हावी म्हणून बाजीप्रभू टॅलेन्ट परीक्षा मोफत घेता. MPSC परीक्षेत यशस्वी मुलांचे सत्कार घेता. किती वैविद्यपूर्ण व नाविण्यपूर्ण उपक्रम राबविता.
शाळेचे काम चोखपणे पार पाडत सुटीत हे सर्व तुम्ही करताना घरचे लोक कसे गप्प बसतात समजत नाही.बायका मुलांना वेळ कधी देता ? घरादारावर तुळशीपत्रच ठेऊनच सर्व चालले आहे.
करोना संसर्गात माणसे घराबाहेर पडण्यास घाबरत असताना तुम्ही वेड्यासारखे राबत आहात."मी नाही आम्ही " या विचारधारेनुसार आपण काम करता.
छत्रपती शाहुमहाराज यांच्या नावे असलेला तालुका असल्याने त्यांच्या समाजकारणाचा वसा आपण घेतला आहे. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली पावन खिंड ( घोडखिंड) आपल्या तालुक्यात आहे. बाजीप्रभूंचा सेवेचा वारसा आपण जोपासत आहात. . शैक्षणिक व्यासपीठाच्या सर्व लेकरांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो.तुमच्या हातून नवनवीन कार्ये घडोत ही प्रार्थना.
आपला स्नेही,
सोबती, सहकारी.
संपत गायकवाड
( माजी सहाय्यक शिक्षण संचालक)