कसबा बावडा प्रतिनिधी ता. 29
कसबा बावडा येथील भारतवीर तरुण मंडळाच्यावतीने रिक्षा व्यावसायिकांना साखर वाटून मदतीचा हात दिला आहे. लाॅकडाऊनच्या काळात रिक्षा व्यवसायाला बंदी घालण्यात आली होती. त्या काळात गेले दोन महिने रिक्षा व्यावसायिक घरी बसून असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन त्यांच्या घरचे संपूर्ण बजेटही कोलमडले होते. सरकारने आर्थिक मदत करावी यासाठी सुद्धा लोकप्रतिनिधी आणि वर्तमानपत्रांतून पाठपुरावा देखील करण्यात आला होता.
आता लॉकडाऊन 4.0 मध्ये प्रशासनाने रिक्षा व्यावसायिकांना काही नियम लागू करून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. पण प्रवासीच नसल्याने पाहिजे तेवढा व्यवसाय होत नाही यामुळे रिक्षाचालक हतबल आहेत. दिवसभर स्टॉपवर उभे राहूनसुदधा क्वचितच भाडे मिळते.
कसबा बावड्यातील भारतवीर मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत कसबा बावडा ते छत्रपती शिवाजी पुतळा मार्गावर रिक्षा व्यवसाय करणार्या रिक्षा व्यावसायिकांना साखर वाटप करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन हरिष चौगले, भारतवीर मित्र मंडळाचे पदाधिकारी व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.