कोल्हापूर प्रतिनिधी -
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही याचा प्रत्यय काल पुन्हा एकदा कोल्हापूरात आला. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे निर्मळ आणि नितळ बनलेल्या पंचगंगेला पुन्हा एकदा अमावस्येच्या निमित्ताने प्रदुषणाचे ग्रहण लागले. कोरोनाच्या महामारीमुळे २२ मार्चपासून लॉकडाऊनमुळे कोल्हापूकरांची जीवशैलीच बदलली. परिणामी रक्षा विसर्जन, सांडपाण्याचा निचरा, शेतातील खते व औषध फवारणी, नदी पात्रात मनुष्य व जनावरांना थेट प्रवेश, सण-उत्सव, अंधश्रध्दा, नागरिकरण आदींमुळे होणारे पंचगंगेच प्रदूषणही थांबून पाणी स्वच्छ, निर्मळ झाले आहे.
पण काल अमावस्येच्या रात्री पुजाविधीच्या नावावर पंचगंगेला प्रदुषणाचे गालबोट लागले. बेजबाबदार नागरिकांनी नदीत आणि घाटावर निर्माल्य, प्रसाद, पुजा साहित्य टाकल्यावर आज सकाळी एकच खळबळ माजली. सामाजिक कार्यकर्ते आणि मनपाच्या स्वच्छता विभागाने पुन्हा एकदा सफाई मोहीम राबविली.
पण निर्मळ आणि स्वच्छ अशा पंचगंगा नदीला गालबोट लावण्याच्या प्रकाराबद्दल पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. नुसतेच आम्ही कोल्हापूरी म्हणायचं आणि कोल्हापूरला अस्वच्छ करायचं असा प्रकार वारंवार होत आहे. लोकांमध्ये जोपर्यंत जनजागृती होणार नाही तोपर्यंत तुकोबांच्या नाही निर्मळ मन , काय करील साबण या पंक्तीची आठवण येत राहणार.