कोल्हापूर प्रतिनिधी -
मेंढपाळ धनगर समाजास लॉकडाऊनमधून वगळण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये आ. ऋतुराज पाटील यांनी केली.
आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, कोल्हापूर दक्षिण मतदार संघामध्ये आणि एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष करत असलेल्या मदत कार्याची सविस्तर माहिती आ. ऋतुराज पाटील यांनी दिली तसेच त्यांनी खालील प्रमुख मागण्या या वेळी ना. बाळासाहेब थोरात यांच्या कडे केल्या.
१. कोल्हापूर ही कलानगरी म्हणून ओळखली जाते. पण, कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर हातावरचे पोट असणाऱ्या अनेक कलाकारांना आज उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा, बँड बँजो वाले आदी कलाकारांना राज्य शासन म्हणून आर्थिक मदत मिळावी.
२. घर मोलकरीण, रिक्षा - टॅक्सिवाले, फेरीवाले, हातगाडीवाले आदी दिवसभर कष्ट केल्यावरच ज्यांचे घर चालते अशा सर्व घटकांना राज्य शासनाकडून आर्थिक मदतीसोबत अन्य सहकार्याची गरज आहे.
३. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे जवळपास ५ लाख धनगर बांधव आहेत. यापैकी तब्बल एक लाखावर कुटुंबांचा शेळ्या-मेंढ्या पालन हाच मुख्य व्यवसाय आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी हे मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र ते विजापूर जिल्ह्यासह कर्नाटक मध्ये कमी पावसाच्या प्रदेशात जात असतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. तसेच खरीप पेरणीमुळे चराऊ कुरणे आरक्षित केली जातात. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या फिरवण्यासाठी जागा नसते. मोठ्या पावसात मेंढ्या दगावण्याचीही शक्यता असते. त्यामुळे मेंढपाळ देशावर किंवा चरणीस जातात.
सध्याच्या लॉकडाऊनमुळे हे सर्वजण कोल्हापूर मधेच आहेत. त्यामुळे मेंढपाळ धनगर समाजाच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यांना आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी मिळावी.