वाशिम, (m आरिफ पोपटे )दि. २०
: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत परतलेल्या नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’च्या सूचना देवूनही ते या सूचनांचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे आता ‘होम क्वारंटाईन’च्या सूचनांचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींकडून २ हजर रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ३१ मे पर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’च्या नियमांचे पालन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, या नागरिकांकडून ‘होम क्वारंटाईन’च्या नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे ‘होम क्वारंटाईन’च्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या व्यक्तींकडून यापुढे २ हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत. तसेच एखाद्या नागरिकाने वारंवार या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्याबरोबरच त्याच्यावर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ व साथरोग अधिनियम १८९७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
*सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड*
सार्वजनिक ठिकाणी, शहरात, गावात फिरताना चेहऱ्यावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टा न बांधणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यापूर्वीच निर्गमित केले होते. आता या दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली असून चेहऱ्यावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टा न बांधणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडून आता ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. या बाबींचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असून दंडाची रक्कमही वसूल केली जाईल.
‘होम क्वारंटाईन’च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, चेहऱ्यावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टा न बांधणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्याचे अधिकार महसूल, पोलीस, आरोग्य विभाचे कर्मचारी, ग्रामसेवक, नगरपरिषद व नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी यांना देण्यात आले आहेत.
*ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समित्यांनी दक्ष रहावे*
बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून परतलेल्या व्यक्तींकडे असलेल्या परवानगीची तपासणी करणे, त्यांची आरोग्य तपासणी करून घेणे. ज्या व्यक्तींकडे पोलीस उपायुक्त अथवा पोलीस अधीक्षकांची रीतसर परवानगी आहे, अशा व्यक्तींना ग्रामस्तरीय समिती लेखी नोटीस देवून ‘होम क्वारंटाईन’ होण्यास कळविणे. तसेच परवानगीशिवाय आलेल्या व्यक्तींची माहिती तहसीलदारांना कळविणे आदी जबाबदाऱ्या ग्रामस्तरीय समिती व वार्डस्तरीय समितीवर सोपविण्यात आल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करताना वेगवेगळे मापदंड लावले जात असल्याचे तसेच काही समित्या प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसून आले आहे.
याशिवाय विलगीकरण केलेल्या व्यक्ती गावात फिरत असल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. त्यामुळे ग्रामस्तरीय अथवा वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीविषयी हलगर्जीपणा अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक इत्यादींचा समावेश असेल, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.