नंदुरबार ( प्रतिनिधी वैभव करवंदकर ) :- - -
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य व इतर सुविधा सुरळीतपणे मिळत आहेत किंवा नाही? हे पाहण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाभरात अचानक २८ भरारी पथके पाठवून एकाच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायती आणि रोजगार हमी योजनेच्या कामाची पहाणी केली. यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण होऊन, सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहतील, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा जी सी यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात नागरिकांचा प्रत्यक्ष संपर्क येणाऱ्या ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पशुवैद्यकीय दवाखाने यातील कामकाज कोरोना विषाणूच्या (covid-19) अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांनुसार सुरू आहे किंवा नाही? हे पाहण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या व उपस्थिती, आरोग्य केंद्रांमधील भौतिक सुविधा, स्वच्छता, तेथील उपकरणे, केंद्रांच्या प्रशासकीय दप्तराची परिस्थिती; त्याचबरोबर औषधांचा उपलब्ध साठा, याबाबत माहिती घेण्यात येत असून, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मासिक सभा नियमानुसार नियमित होतात काय?, ग्रामसभा नियमांनुसार पार पडत आहेत काय?, ग्रामपंचायतीने विविध नोंदवह्या अद्ययावत ठेवल्या आहेत काय?, ग्रामपंचायतींची कर वसुली योग्यरीत्या केली जात आहे का?, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांची कामे योग्यरीत्या केली जात आहेत काय?, अशा पद्धतीची पाहणी या भरारी पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये सुद्धा उपस्थित कर्मचारी वर्ग, त्यातील तांत्रिक कामाचा आढावा, साथीच्या रोगाबाबत दवाखान्यात ठेवण्यात आलेल्या नोंदवह्या, तसेच ग्रामस्थांसाठी दवाखान्याची माहिती भिंतीवर लावण्यात आली आहे काय? या बाबींचा भेटीतील पाहणी मुद्द्यांमध्ये समावेश आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरही या पथकांकडून भेटी देण्यात आल्या असून, कामावरील मजूर उपस्थिती तपशील, मजुरांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा तपशील, पूर्ण झालेल्या किंवा चालू असलेल्या कामांबाबत तपशील, मजुरी वाटपाचा तपशील, अशी माहिती महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांवर भेटी देऊन या पथकांनी घ्यावयाची होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली २८ पथकांची एकूण ८४ अधिकाऱ्यांच्या समावेशाने नियुक्ती केली होती. त्यात स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेखर रौंदळ, उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घोडमिसे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भुपेंद्र बेडसे, महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री अतुलकुमार गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, लेखाधिकारी श्री मनोज परदेशी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री दिलीप चौधरी, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सुनिल शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रमोद बडगुजर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री उमेश पाटील, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्यक्रम समन्वयक अनिकेत पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री प्रदीप लाटे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी श्री नारायण पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. सी. एस. जाधव, नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अशोक पटाईत, शहादा चे गटविकास अधिकारी श्री. सी. टी. गोसावी, धडगावचे गट विकास अधिकारी श्री सी. ए. बोडरे, अक्कलकुवाचे गटविकास अधिकारी श्री. सी.के. माळी, नवापुरचे गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर, तळोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री आर. बी. सोनवणे, ग्रामपंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री महेश वळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री बी. डी. गोसावी, सहायक गटविकास अधिकारी श्री. महेश पोतदार यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या २८ पथकांतील ८४ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती तसेच पशुवैद्यकीय दवाखाने व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व भागात गेलेल्या पथकांकडून जिल्ह्यातील सद्यस्थितीचा अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होण्याची अपेक्षा जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या नेमणुकीच्या ठिकाणी पुर्णवेळ उपस्थित राहून शासनाच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत सुरळीत पोहचविण्यासाठी व त्यांची १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी सजग रहावे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना प्रत्यक्ष काम करतांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन योग्यरीत्या मार्गदर्शन करणे,
हाच या भरारी पथक नियुक्तिमागचा उद्देश्य असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांनी सांगितले.