गांधीनगरात चार दिवस दुकाने उघडी राहणार ; तावडे हॉटेल वरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी
गांधीनगर : प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
दुकाने चालू ठेवायची की बंद ठेवायची यावरून व्यापाऱ्यांमध्ये मतभिन्नता झाल्याने गांधीनगर बाजारपेठेत आज मंगळवारी एकच गोंधळ उडाला. मतभिन्नता वाढतच गेल्याने गोंधळामध्ये वाढ होत गेली. ठीकठिकाणी गटागटाने एकत्र येऊन व्यापाऱ्यांमध्ये चर्चा होत राहिली. पण एकमत न झाल्याने अखेर रिटेल व्यापारी असोसिएशनची बैठक होऊन त्यात आठवड्यातून चार दिवस दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा यांनी जाहीर केला. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून गांधीनगर पोलिसांनी तावडे हॉटेलनजीक नाकाबंदी केली.
सकाळी सात वाजता काहीजण दुकाने उघडण्यास आले. ते दुकान उघडतात न उघडतात तोच काहीजण दुकाने बंद करा म्हणू लागले. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, आणखी काही दिवस दुकाने बंद ठेवू या, असे त्यांचे म्हणणे होते. पण दुकान उघडणारे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तिथे वादविवाद झाला. मोठी गर्दी जमू लागली. व्यापाऱ्यांमध्ये गटागटाने चर्चा होऊ लागली. पण एकमत न झाल्याने व्यापारी मोठ्या संख्येने गांधीनगर पोलीस ठाण्यासमोर आले. दुकाने सुरू ठेवायची कि बंद ठेवायची, याचा निर्णय संबंधित व्यापारी असोसिएशनने घ्यायचा आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात व्यापाऱ्यांची मते आजमावण्यात आली. चर्चेनंतर मंगळवार, गुरुवार, शनिवार व रविवार असे आठवड्यातील चार दिवस दुकाने उघडण्याचा निर्णय झाला. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने चालू राहतील. त्यावेळी व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगसह सर्व शासकीय नियम व अटी पालन करण्याचेही ठरले. हा निर्णय कुकरेजा यांनी जाहीर केल्यानंतर या वादावर पडदा पडला.
दरम्यान, कोणतीही संसर्गित व्यक्ती गांधीनगरमध्ये येऊ नये, यासाठी गांधीनगर पोलिसांनी तावडे हॉटेलनजीक नाकाबंदी केली. गांधीनगरमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी केली गेली. कोरोनाचे जिल्ह्यातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार योग्य ती दक्षता घेत असल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी सांगितले.