Monday 25 May 2020

mh9 NEWS

मुस्लीम समाजाचे योगदान अतुलनीय - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे - इचलकरंजीतील मुस्लीम समाजाची प्रशंसा


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय)-कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून  कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले. 
  इचलकरंजीमधील समस्त मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते. बोलत होते. यावेळी सार्वजनिक  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार समस्त मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची रक्कम कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी 36 लाख रुपये दिली. या रकमेतून इंदिरा गांधी असामान्य रुग्णालयात 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला आहे. रमजान ईदचे औचित्य साधून याचे लोकापर्ण करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे संवाद साधताना म्हणाले, इचलकरंजीतील मुस्लिम समाजाने याद्वारे एक मोठा आदर्श देशासमोर ठेवला आहे. आत्तापर्यंत आपण सर्वांनी मिळून कोरोनाला धैर्याने आणि संयमाने रोखून ठेवले आहे. इथून पुढे लोकसहभाग गरजेचा आहे. सण कसा साजरा करायचा याचे उत्तम उदाहरण मुस्लिम समाजाने सर्वांना दाखवून दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
  सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुस्लिम समाजाच्या कार्याचे कौतुक करून रुग्णालय सर्वच सुविधांनी सुसज्ज करण्याचे आश्वा सन दिले.
प्रारंभी सलीम अत्तार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार राजू आवळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपाधिक्षक गणेश बिरादार, तहसिलदार प्रदिप उबाळे आदी उपस्थित होते.
  अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी कैश बागवान, रफिक मुजावर, इरफान बागवान, अजीज खान, कुतबुद्दीन मोमीन, सलीम अत्तार, तौफिक मुजावर, अबु पानारी, इम्रान मकानदार, तौफिक हिप्परगी, फिरोज जमखाने, आयुब गजबरवाडी, समीर शेख, दिलावर मोमीन, फिरोज बागवान, फारूक मकानदार, डॉ. जावेद बागवान, डॉ. राहमतुल्लाह खान, डॉ. अर्शद बोरगावे, डॉ. हिदायतुल्लाह पठाण, इम्तियाज म्हैशाळे यांचे  सहकार्य लाभले.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :